भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: June 7, 2024 02:32 PM2024-06-07T14:32:09+5:302024-06-07T14:32:44+5:30
न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही...
भिवंडी: शहरात शेकडो बांगलादेशी नागरीक पकडले गेले असतानाच शहरात १९७१ पासून दोन पाकिस्तानी नागरीक वास्तव्यास असल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात एकूण नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असगरअली मोहम्मद अली अन्सारी या ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने भिवंडीत हारुन उमर परकार व अस्लम उमर परकार हे जन्माने पाकिस्तानी नागरीक १९७१ पासून भिवंडी शहरात वास्तव्य करीत असून त्यांना आशिक अब्दुल रहमान परकार,अल्लाउददीन अब्दुल्लाह परकार,नाजीम कुरैशी,अशफाक अहमद मुशताक हाशमी,इजाज अहमद मुशताक हाशमी,हुसैन मेहमुद खान,रौफ हुसैन परकार अशा सात जणांनी ते पाकिस्तानी नागरीक असल्याचे माहीत असतानाही त्यांना बनावट ओळखपत्र, व इतर कागदपत्र बनवुन देवून अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन देवुन भारताच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केला असल्याची तक्रार भिवंडी न्यायालयात दिली होती.
या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने शांतीनगर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात असगर अली मोहम्मद अली अन्सारी यांच्या फिर्यादी वरून फसवणुकीसह परदेशी नागरी कायदा,पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी अजून कोणालाही ताब्यात घेतले नसून या प्रकरणी तपास करीत आहेत.तपासाअंती पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.