भिवंडीत रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू
By नितीन पंडित | Published: May 7, 2024 04:23 PM2024-05-07T16:23:25+5:302024-05-07T16:24:16+5:30
अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडीत दोन वेगवेगळ्या दुर्घटनां मध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून दोन्ही घटनांबाबत नारपोली पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका घटनेत पादचाऱ्यास ट्रक ने धडक दिल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
२७ एप्रिल रोजी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड च्या गेटवर रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास तोहीत फुन्नन अली वय ४२ वर्षे हा इसम घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभा असताना मानकोली कडून आलेला आयशर ट्रक चालकाने ट्रक भरधाव चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तोहीत अली यास ठोकर देऊन गंभीर दुखापत करून ट्रक चालक पसार झाला.जखमी तोहीत अली यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या बाबत कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या दुर्घटनेत अंजुरफाटा येथील रस्त्यावर राहनाळ गावात राहणारे राजेश भोला गुप्ता वय ४४ वर्षे हे सकाळी साडे नऊ वाजता च्या सुमारास रस्त्या कडेला हातगाडीवर सामान विक्री करीत उभे असताना मारुती स्विफ्ट कार चालकाने कार भरधाव चालवून हातगाडी चालकास जोरदार धडक दिली.यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.या दोन्ही प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.