हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: January 18, 2024 08:27 PM2024-01-18T20:27:15+5:302024-01-18T20:27:28+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: एका पीडितेची सुटका
ठाणे: डोंबिवलीतील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला व्यवस्थापकासह चाैघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील काटई टोल प्लाझाजवळील लोढा पॅलेसजवळ असलेल्या ‘आमंत्रण लॉजिंग अँड बोर्डिंग’ या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास एका खबऱ्याने दिली होती. त्याच माहितीच्या आधारे १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने काटई टोल प्लाझाजवळील या हॉटेलमध्ये सापळा रचून एक पुरुष दलाल, दोन पुरुष वेटर आणि एक महिला व्यवस्थापक यांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटकाही करण्यात आली आहे. या आरोपी विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात कलम ३७० (२) , ३४, सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिडित महिलेला उल्हासनगर येथील सुरक्षा गृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वेटर आणि दलाल पाठवायचे मुलींचे फोटो-
या हॉटेलमधील वेटर आणि दलाल हे ग्राहकांना हेरुन आधी सौदा करायचे. त्यानंतर ते पैशाच्या अमिषाने शरीरविक्रयासाठी तयारी दर्शविणाऱ्या मुलींचे फोटो व्हॉटसअॅपवरुन ग्राहकांना पाठवायचे. यातील काही पैसे स्वतत:कडे तर काही पैसे हे त्या मुलींना दिले जायचे. पोलिसांच्या बनावट ग्राहकानेही असे फोटो मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर या हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली.