मीरा भाईंदर मधील दोघा अट्टल गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी केले तडीपार
By धीरज परब | Published: July 12, 2024 07:21 PM2024-07-12T19:21:29+5:302024-07-12T19:21:50+5:30
Mira Road News: मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी भाईंदरच्या दोघा अट्टल गुन्हेगारांना २ वर्षां करिता ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी भाईंदरच्या दोघा अट्टल गुन्हेगारांना २ वर्षां करिता ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे .
भाईंदर पूर्वेला लारा पालनाथ नाडार ( ३८ ) यांच्यावर २०१२ ते २०१४ या कालावधीत उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत, गर्दी करुन मारामारी करणे, दुखापत करुन जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत . २०१४ मध्ये ठाणे उपविभागीय दंडाधिकारी यांनी लारा ह्याला ६ महिन्यासाठी तडीपार केले होते. तडीपार करुनही लारा ह्याने नवघर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करत दहशत माजवली . नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावरखंडणी मागणे, महिला अत्याचार, अपंग व्यक्तीशी गैरवर्तन, फसवणूक आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले. लारा वर १० गुन्हे दाखल आहेत . पोलिसांनी लारा ह्याला ठाणे , पालघर , मुंबई , मुंबई उपनगर अश्या ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे .
उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश मोहन शेट्टी (२५ ) ह्याला देखील दोन वर्षांसाठी ५ जिल्ह्यातून तडीपार केले गेले आहे . शेट्टी याच्यावर २०१७ ते २०२३ याकालावधीत उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत, मारामारी करणे, चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत . त्याच्यावर २०२३ मध्ये चॅप्टर केस करून देखील त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही . त्याच्यावर ८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला देखील ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यातून तडीपार केले आहे अशी माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली .