ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी झाले कोरोनातून मुक्त : अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले अनोखे स्वागत

By जितेंद्र कालेकर | Published: April 22, 2020 09:46 PM2020-04-22T21:46:00+5:302020-04-22T21:57:22+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकारी आणि १४ कर्मचारी अशा १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. आता मुंब्रा आणि ठाणेनगर येथील दोन पोलीस अधिकारी हे कोरोनामुक्त झाल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रीयाही पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी व्यक्त केली.

Two police officers from Thane released from Corona: Officers and staff gave a unique welcome | ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी झाले कोरोनातून मुक्त : अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले अनोखे स्वागत

कर्मचा-यांनी केला फूलांचा वर्षाव

googlenewsNext
ठळक मुद्देदोन पोलीस उपायुक्तांसह अधिकाऱ्यांची हजेरी कर्मचा-यांनी केला फूलांचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि ठाणेनगरचे सहायक पोलीस निरीक्षक हे दोन्ही अधिकारी आता कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या दोन्ही अधिका-यांचे ठाणे शहर पोलिसांनी होरायझन रुग्णालयाबाहेर जोरदार स्वागत केले. या अधिका-यांची प्रकृती सुधारल्यामुळे ठाणे पोलिसांचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असल्याची प्रतिक्रीया पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी व्यक्त केली.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोरानामुक्त झाल्याची माहिती मिळताच वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे, कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्यासह अनेक अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी होरायझन रुग्णालयाबाहेर उपस्थित होते. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हे निरीक्षक बाहेर पडल्यानंतर सर्व पोलीस अधिका-यांनी त्यांचे टाळयांच्या गजरात स्वागत केले. उपायुक्तांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले. तर कर्मचा-यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वपूर्ण कामगिरी बजावणा-या ठाणे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करणारे फलक पोलीस कर्मचा-यांनी हातात घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. तत्पूर्वी, याच रुग्णालयातून ठाणेनगरचे सहायक पोलीस निरीक्षक हेही पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांनाही मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांच्यासह अन्य काही अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.
* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत पोलीस मुख्यालयातील सहा कर्मचारी, मुंब्रा पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी आणि तीन अधिकारी, नारपोलीतील एक कर्मचारी आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तीन अशा चार अधिकारी आणि १४ कर्मचा-यांना म्हणजे १८ पोलिसांना लागण झाली. त्यातील दोघेजण आता कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या आता १६ वर आली आहे.आतापर्यंत २४ अधिका-यांसह १६४ पोलिसांना कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

‘‘ आजाराला घाबरु नका. उपचार घेतल्यावर तो बरा होतो. पण आजार होण्याची वेळच येऊ देऊ नका. घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडला तर मात्र सोशल डिस्टसिंगचे नियम पाळा. स्वच्छता ठेवा.’’
कोरोनामुक्त पोलीस निरीक्षक, मुंब्रा
 

‘‘ ठाणे शहर परिमंडळातील या दोघांसह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेही अधिकारी कोरानामुक्त झाल्यामुळे ठाणे शहर पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे. अनेक सहकारी हे आजारी असल्यामुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण झाले होते. पोलीस किंवा नागरिक कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्वांनीच सोशल डिस्टसिंग आणि शासनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.’’
सुभाष बुरसे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

 

Web Title: Two police officers from Thane released from Corona: Officers and staff gave a unique welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.