घरफोडी करणाऱ्यामध्ये टोळीत कल्याण जेल मधून पळालेल्या दोन कैद्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:13 PM2019-03-19T22:13:03+5:302019-03-19T22:14:57+5:30
भिवंडी : तालुक्यातील पुर्णा गावात प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामाचे शटर उचकटून २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे कापड बनविण्यासाठी ...
भिवंडी: तालुक्यातील पुर्णा गावात प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामाचे शटर उचकटून २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे कापड बनविण्यासाठी लागणारे यार्नचे थैले पंधरा दिवसांपुर्वी चोरून नेले होते. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांच्या टोळीस मुद्देमालासह अटक केली आहे. या आरोपींची अधिक चौकशी करता त्यामध्ये कल्याण आधारवाडी जेलमधून दहा वर्षापुर्वी पळालेले दोन कैदी आढळून आले.
पुर्णा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील बी.एन.एस. रोज कॅरिअर्स या ट्रान्सपोर्टच्या गोदामात १ मार्च रोजी रात्री दरम्यान घरफोडी करून चोरांनी २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे यार्नचे थैले चोरले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी भादवड येथुन शादाब उर्फ पिल्ला अब्दुल वाहिद कुरेशी (२३), नागाव येथील आलमशेठ यांच्या कारखान्यातून सागर उर्फ शिवमंगल मिश्रा(३२)तर शिळफाटा कल्याण येथून दलाल रामलाल चौहाण(२३)व मुंबई मानखुर्द येथुन राजू उर्फ राजकुमार बरसाती हरिजन(३०) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला यार्नचा सर्व माल जप्त केला. त्यांची अधिक चौकशी करता असे आढळून आले की, सागर उर्फ शिवमंगल मिश्रा व राजू उर्फ राजकुमार बरसाती हरिजन यांच्या विरोधात सन २००८ साली कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना आधारवाडी जेलमध्ये पाठविण्यात आले होते. ते कैदेत असताना २ आॅक्टोंबर २००८ रोजी कल्याण येथील आधारवाडी जेलमधून ते दोघे पळून गेले होते. ते पळालेले कैदी दहा वर्षांनी या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने जेलमध्ये रवाना केले आहेत.