भिवंडीत कोविड सेंटरच्या पंधराव्या मजल्याच्या बाथरूम खिडकीतून दोन कैदी पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:17 PM2021-04-23T21:17:03+5:302021-04-23T22:09:02+5:30
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी कल्याण बायपास मार्गावर असलेल्या रांजनोली येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या १५ व्या मजल्यावर कोरोना बाधित असलेल्या २ अट्टल कैद्यांवर उपचार सुरु असतानाच या दोन्ही कैद्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढत १५ व्या मजल्यावरून बाथरूमच्या पाईपवरून खाली उतरून पसार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोघा फरार आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. गाजीदारा जाफरी (वय, २५) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय ३३) असे फरार झालेल्या दोघा अट्टल कैद्यांची नावे आहेत.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित या सर्व कैद्यांची उपचारासाठी ठाणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच फरार झालेले गाजीदारा जाफरी आणि खुर्शीद या दोघांचाही शिक्षा भोगत असताना कारागृहात १९ एप्रिलला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांना उपचारासाठी कल्याण - भिवंडी मार्गावर रांजणोली नाका बायपास येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या १५ व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असल्याचा फायदा घेत, १५ मजल्यावरच्या रूममधील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर पडत पाईपवरून खाली येत पळ काढला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरार कैदयांचा शोध सुरु केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहेत.