कळव्यात गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोघे रहिवासी जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: April 18, 2024 18:05 IST2024-04-18T18:05:43+5:302024-04-18T18:05:59+5:30
यामध्ये मुस्तफा अहमद (१८) आणि मुज्जमिल अहमद (१८) हे बांधकाम कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

कळव्यात गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोघे रहिवासी जखमी
ठाणे: कळवा, कावेरी सेतू येथे तळ अधिक ३९ मजली आशार हायराईज, 'बी' विंग या नविन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्याला असलेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांच्या किचन रूममधील मिनी एचपी-गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये मुस्तफा अहमद (१८) आणि मुज्जमिल अहमद (१८) हे बांधकाम कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
कळवा येथे गॅस गळती झाल्याने आगीचा भडका उडून त्यामध्ये दाेघेजण जखमी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलीसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या पथकांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केले. याचदरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुस्तफा याच्या उजव्या पायाला एक टक्के तर मुज्जमिल याच्या उजव्या हाताला नउ टक्के भाजल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.