वासिंद येथून दोन रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसांसह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:47 PM2019-04-04T21:47:16+5:302019-04-04T21:53:55+5:30
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी वासिंद रेल्वे स्थानक परिसरातून अमीर खान याला दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसांसह गुरुवारी अटक केली.
ठाणे: बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या अमीर शब्बीर खान (२६, रा. टिटवाळा) याला गुरुवारी दुपारी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयात आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, धनंजय पोरे आणि उपनिरीक्षक जी. एस. सुळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वासिंद रेल्वे स्थानक पार्र्किंग परिसरात ४ एप्रिल रोजी सापळा लावला. तिथे खान हा संशयास्पदरित्या वावरतांना आढळला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच त्याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्याने उत्तरप्रदेशातून प्रत्येकी दहा हजारांमध्ये हे पिस्टल आणल्याचे सांगितले. त्याने यापूर्वीही अशी शस्त्रे आणली आहेत का? तो ठाणे ग्रामीण परिसरात ती कोणाला विकणार होता? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या वासिंद युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.