भिवंडीत एकाच दिवशी चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीच्या घटनांची नोंद
By नितीन पंडित | Published: August 2, 2022 06:24 PM2022-08-02T18:24:09+5:302022-08-02T18:24:43+5:30
भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत असताना सोमवारी एकाच दिवसात शहरात चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद
नितिन पंडीत
भिवंडी :
भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत असताना सोमवारी एकाच दिवसात शहरात चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. शहरात रोजच्या वाहन चोरीच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत तर पोलीस या वाहनचालकांचा शोध घ्यायचा कसा या विवंचनेत आहेत.त्यामध्ये एकट्या भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे घडले आहेत.
तबरेज सोहराब मोमीन यांनी ते राहत असलेल्या स्काय अपार्टमेंट, जुनागौरी पाडा येथे आपली मोटार सायकल रात्री उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीने ते चोरी केली आहे.तर हाफिज नगर येथील सानिया अपार्टमेंट येथे राहणारे मोहंमद अफसर अन्वर अन्सारी यांनी होंडा कंपनीची डीयो दुचाकी इमारती खाली उभी केली असता ती रात्रीस चोरी झाल्याचे सकाळी आढळून आले.भंडारी कंपाऊंड नारपोली येथील गोलबाल हॉस्पिटल शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रेमचंद सत्यनारायण पटेल यांनी सार्वजनिक रस्त्यावर आपली रिक्षा उभी करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने पळवून नेली या तिन्ही प्रकरणात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्यासोबतच नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील ओवळी गावात राहणारे वृषभ अरविंद पाटील याने आपली होंडा युनिकॉर्न दुचाकी घराबाहेर उभी करून ठेवली असता ती चोरीस गेली आहे .शहर पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान टेकडी रोड वरील संगम बार जवळ राहणाऱ्या संगीता मुक्तवा बर्गी यांनी आपली स्कुटी या भागात उभी करून ठेवली असता सायंकाळी ती चोरीस गेली तर शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत आशीषकुमार होरी लालपाल या रिक्षा चालकाने नागाव येथील यश हॉटेल शेजारील सार्वजनिक रस्त्यावर आपली रिक्षा उभी करून ठेवली असता ती चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे भिवंडी शहरात मागील काही दिवसात झालेल्या वाहन चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणेची चिंता वाढली आहे.