ठाण्यात तरुणीची छेड काढणारे दोन रोडरोमियो जेरबंद: श्रीनगर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 09:17 PM2018-02-25T21:17:01+5:302018-02-25T21:17:01+5:30
किसननगर भागात एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग होत असतांना तिने पोलीस नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरुन श्रीनगर पोलिसांनी चौघांपैकी दोघांवर तात्काळ कारवाई केल्याची घटना शनिवारी घडली.
ठाणे: पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची किसननगर शिवाजीनगर भागात छेडछाड काढणा-या चौघांपैकी दोघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतांनाच तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरुन अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.
अरबाज नियाज खान (१८, रा. कादरी मंजील, पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह अन्य एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरबाज सह चौघेजण शिवाजीनगर भाजीमार्केट ठाणे महापालिका शाळेकडे जाणा-या रस्त्यावर या इव्हेंट मॅनेंजमेंटचा व्यवसाय करणा-या तरुणीची सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास छेड काढीत होते. तिच्या कुत्र्याचे नाव विचारण्याचा बहाणा करीत तिचेही त्यांनी वारंवार नाव विचारले. नंतर तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत गराडा घालून चौघांनीही तिला पुढे मागे जाण्यास मज्जाव केला. त्याचवेळी तिथून जाणाºया एका मित्रालाही तिने हा प्रकार सांगितला. ती त्याच्या मदतीने पुढे जाऊ लागल्यानंतरही त्यांनी तिचा पाठलाग करीत पुन्हा छेड काढणे सुरूच ठेवले. तिने अखेर ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या एक शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधून या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस नाईक आर. आर. गार्डे, टी. टी. पोटेकर, कॉन्स्टेबल ए. बी. बावणे आणि वाय. सी. राठोड आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन छेड काढणा-या चौकडीपैकी दोघांची धरपकड केली. पोलिसांची व्हॅन पाहून त्यातील उर्वरित दोघांनी मात्र पलायन केले. दरम्यान, अरबाज याची ठाणे न्यायालयाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रविवारी सुटका केली. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोमवारी भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.