उल्हासनगर नेवाळीतील दोन शाळेकरी मुलाचा रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागरिकांचा रस्ता रोखो
By सदानंद नाईक | Published: March 23, 2023 07:16 PM2023-03-23T19:16:05+5:302023-03-23T19:16:29+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ७ व ८ ...
सदानंद नाईक
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ७ व ८ वयोगटातील शाळेकरी दोन मुलांचा पडून मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईक व नागरिकांनी रस्ता रोखो आंदोलन करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
उल्हासनगर शेजारील नेवाळीगाव डावलपाडा या परिसरात एमआयडीसीने जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्या लगत खड्डा खोदण्यात आला. मात्र गेले काही दिवस काम बंद असल्याने, पाण्याने भरलेल्या खड्ड्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून ठेकेदाराने बॅरिकेट्स लावने गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ८ वर्षाचा सनी प्रमोद यादव व ७ वर्षाचा सुरज मनोज राजभर हे खेळत असतांना पाण्यात पडले. दरम्यान दोघेही मुले दिसत नसल्याने, नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, खड्ड्यात मुले पडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी संशय व्यक्त केला. खड्ड्यात शोध घेतला असता दोघांचाही मृतदेह आढळले.
याप्रकारने मृत शाळेकरी मुलांचे नातेवाईक व नागरिक संतप्त होऊन शेजारी मुख्य रस्तावर रस्तारोखो आंदोलन करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळाल्यावर हिललाईन पोलिसांनी धाव घेऊन मुलाचे मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले. तसेच पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. याप्रकारने नेवाळी डावलपाडा येथे शोककळा पसरून ठेकेदारावर गुन्हा दाखल करीत नाही, तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका सुरवातीला नागरिकांनी घेतल्याने, वातावरण तणावग्रस्त झाले होते. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर मुलावर गुरवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.