ठाण्यातील डान्सबार प्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:41 PM2021-07-19T21:41:08+5:302021-07-19T21:50:33+5:30
पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना आता ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोरोनाचे निर्बंध लागू असतांनाच ठाणे शहरातील भर वस्तीमध्ये मात्र खुल्लमखुल्ला डान्स बार सुरु असल्याची माहिती हाती येताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना आता ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त पोलीस आयुक्ताच्या ंमार्फतीने चौकशीचे आदेशही दिले आहेत.
ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन बारसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज हे तीन डान्सबार सर्रासपणे सुरु असल्याची माहिती उजेडात आली. शिवाय, या डान्सबारमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवित खुलेआमपणे बारबालांचा डान्सही सुरु होता. ही माहिती समोर येताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी तातडीने पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. याचीच दखल घेत ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी प्रथमदर्शनी संक्षिप्त चौकशीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना सोमवारी सायंकाळी निलंबित केले. तर नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांचीही कर्तव्यात कसूरी केल्याने ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ठाणे शहरातील आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तीन बारचा परवानाही निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ प्राथमिक चौकशीत नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन बार सुरु असल्याचे आढळल्यामुळे दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची तर दोन सहायक आयुक्तांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात येत आहे.’’
जयजित सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर