कळव्यात गॅसचा भडका उडाल्यामुळे दोघे गंभीर जखमी; शांतीनगरमधील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: August 20, 2024 11:33 PM2024-08-20T23:33:49+5:302024-08-20T23:34:02+5:30
एका जखमीला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल
ठाणे: कळव्यातील शांतीनगर भागातील एका घरातील सिलेंडर गॅसचा भडका उडाल्यामुळे अशोक कुमार ( ५२) आणि समीर शेख (२०) हे दोघेजण होरपळून गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. यातील अशोक याच्यावर मुंबईच्या सायन येथील लाेकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळव्यातील शांतीनगर भागातील दुर्गादेवी मंदिराजवळील साईबाबाबा चाळीच्या जावेद यांच्या मालकीच्या घरामध्ये अशोक कुमार हे वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरातील एच.पी. कंपनीच्या मिनी गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज होऊन भडका उडाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याच भडक्यामुळे लागलेल्या आगीमध्ये अशोक कुमार हे गंभीर जखमी झाले. तर शेजारच्या घरातील समीर शेख हेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही सुरुवातीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे अशोक कुमार यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तर समीर यांच्या डाव्या हाताला आणि शरीराच्या इतर काही ठिकाणी भाजले आहे.
घटनास्थळी भडका उडाल्याने घरातील साहित्य आणि कपडे जळाले. तसेच शेजारील शांताबाई गुडदे यांच्या घराचे लाकडी खांब तसेच भिंत म्हणून लावलेले पत्रे कोसळून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवाहरबाग केंद्रावरील जवानांनी ही आग अवघ्या अर्धा तासांमध्येच आटोक्यात आणली. कळवा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागानेही घटनास्थळी धाव घेत याठिकाणी बचावकार्य राबविले.