लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:55+5:302021-07-04T04:26:55+5:30

ठाणे : गेले काही दिवस लसीकरण उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. परंतु, शनिवारी पुन्हा लसीकरण ...

Two Shiv Sena office bearers clashed at the vaccination center | लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले

लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले

Next

ठाणे : गेले काही दिवस लसीकरण उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. परंतु, शनिवारी पुन्हा लसीकरण सुरू झाल्याने पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. शिवाईनगरात तर लसीकरणावरून शिवसेनेचे दोन पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. अखेर येथे पोलिसांना पाचारण केल्यानंतर वातावरण शांत झाले. परंतु, या काळात लसीकरण केंद्रे बंद ठेवली होते. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावरही गर्दी होऊन तेथेही पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली होती.

दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातच लसीकरण बंद होते. शुक्रवारी सायंकाळी लस प्राप्त झाल्यानंतर ठाण्याच्या विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर पहाटेपासूनच नागरिकांनी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने लसीकरण सुरू होते. त्यातही काही केंद्रांवर लसी कमी आल्याने यात आणखी गोंधळ वाढल्याचे चित्र बहुतेक सर्वच केंद्रांवर दिसत होते. त्यातही काही दिवसांपासून पालिकेच्या लसी घेऊन राजकीय मंडळींकडून त्या वाटल्या जात आहेत. मोफत मिळणाऱ्या लसींवरदेखील राजकीय मंडळींचे मार्केटिंग सुरू केल्याचे चित्र शहरभर दिसत होते. त्यामुळेच अधिकचा गोंधळ होऊन काही ठिकाणी राजकीय मंडळींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आल्याचे पाहावयास मिळाले.

दुसरीकडे शिवाईनगर केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने लसीकरण सुरू होते. परंतु, शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईनचे सर्वच बुकिंग हायजॅक केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रांगेत उभ्या असलेल्यांना लस मिळत नव्हती. त्यामुळे याच मुद्द्यावर शिवसेनेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. त्यावरून या ठिकाणी बराच वेळ गोंधळ उडाला होता. अखेर हा गोंधळ शांत होत नसल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर काही काळ हे लसीकरण केंद्र बंद ठेवले. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर ते पुन्हा सुरू झाले.

खासदार राजन विचारे यांनी देखील शनिवारी मोफत लसीकरण ठेवले होते. त्याठिकाणीदेखील थेट दोन किमीपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. याठिकाणीदेखील मर्जीतील नागरिकांना आधी सोडले जात असल्याच्या मुद्द्यावरून इतर नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे त्याठिकाणीही पोलिसांना पाचारण करावे लागले. विशेष म्हणजे नागरिकांची गर्दी आणि गोंधळ पाहून विचारे यांनीदेखील कार्यकर्त्यांवर राग काढला.

मोफतच्या लसींवर नगरसेवकांचे मार्केटिंग

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या राजकीय मंडळींना लसी दिल्या जात आहेत. शासनाकडून मोफत लसी उपलब्ध होत आहेत. त्याच लसी या मंडळींना दिल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच नागरिकांना त्या मोफतच मिळणार आहेत. परंतु, असे असेल तरी या नगरसेवकांच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचे फलक मात्र शहराच्या विविध भागात लागल्याचे दिसत असून, नगरसेवक तर या माध्यमातून स्वत:चे ब्रँडिंग करताना दिसत आहेत.

Web Title: Two Shiv Sena office bearers clashed at the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.