‘त्या’ दोन बहिणींच्या आत्महत्येचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 01:49 AM2016-07-16T01:49:05+5:302016-07-16T01:49:05+5:30
सागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे
आकाश गायकवाड, डोंबिवली
सागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीस व त्यांचा भाऊही बुचकळ्यात पडला आहे. दरम्यान, चार दिवसांत त्यांच्या घरी नातेवाईक तसेच कोणीच कसे फिरकले नाही, याचा पोलीस शोध घेत आहेत.
सागर्ली गावातील शंभू गावदेवीनगर चाळीत कांबळे कुटुंबीय पूर्वी राहत होते. रामा कांबळे हे त्यांची पत्नी लक्ष्मी, मोठी मुलगी इंद्राबाई, लकावा व लहान भाऊ लखाप्पा यांच्यासह राहत होते. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेत कामाला होते. लखाप्पा हा १० वर्षांचा असताना लक्ष्मी यांचे निधन झाले. त्यामुळे रामा यांच्यावर घरातील सर्व जबाबदारी पडली. २००४ मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी इंद्राबाई व लकावा यांनी स्वीकारली. लखाप्पा लहान असल्याने दोघा बहिणींनी स्वत: शाळेत न जाता घरकाम करून त्याला वाढवले. त्याला नववीपर्यंत शिकवले. त्यामुळे बहिणींनी विवाहही केला नाही. लखाप्पा मोठा झाल्यावर टेम्पोचालक म्हणून काम करून बहिणींना मदत करू लागला. बहिणींनी २००५ मध्ये त्याचा सुषमाशी विवाह लावून दिला. तसेच त्यांनी त्याला श्री समर्थ कृपा बिल्डिंगमध्ये भाड्याने घर घेऊन दिले. त्या स्वत:च्या जानकी दत्तू अपार्टमेंटमध्ये वेगळ्या राहू लागल्या. त्या धुणीभांडी करून स्वत:चे पोट भरत होत्या. तसेच भावाच्या संसारालाही गरज भासेल, तेव्हा हातभार लावत होत्या.
लखाप्पाला विनय नावाचा मुलगा आहे. त्या त्याचेही खूप लाड करीत होत्या. लखाप्पा त्यांच्याकडे दोन-तीन दिवस जाऊनयेऊन असायचा. बहिणीही भाऊ, भावजय व भाच्याला नेहमी भेटत असत. मागील आठवड्यात लखाप्पा त्यांच्याकडे जाऊन नाश्ता करून आला होता.