गुडविनच्या मालकांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांची दोन विशेष पथके
By जितेंद्र कालेकर | Published: October 30, 2019 10:36 PM2019-10-30T22:36:22+5:302019-10-30T22:42:54+5:30
एकापेक्षा एक प्रलोभने देत लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून २०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करुन पसार झालेल्या गुडविनच्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या भावांसह पाच आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
ठाणे : सुमारे २०० गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या सुनीलकुमार अकराकरण या ‘गुडविन’च्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच जणांच्या शोधासाठी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन विशेष तपास पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. डोंबिवली, शिवाजीनगर पाठोपाठ नौपाड्याचाही गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असून डोंबिवलीतील पलावा येथील आरोपीच्या घरी बुधवारी या पथकाने दिवसभर झडतीसत्र राबविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुंतवणुकीवर जादा व्याजाचे तसेच सोन्याचे दागिने देण्याचे प्रलोभन दाखवून ठाणे शहर आणि मुंबई परिसरातील १८० जणांची सुमारे साडे कोटींची फसवणूक करणाऱ्या सुनीलकुमार अकराकरण या ‘गुडविन’च्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच जणांविरुद्ध ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधी सुरुवातीला डोंबिवलीत चार कोटींच्या फसवणुकीचा तर अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन कोटी ७० लाखांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आधी डोंबिवलीचा गुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आता या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन नौपाडा आणि शिवाजीनगर येथील दोन्ही गुन्हे हे आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी वर्ग करण्यात आले.
* घरांच्या झडतीचा तपशिल गुलदस्त्यात
दरम्यान, यातील आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले. त्यानुसार आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली आहे. त्यातील पोलीस निरीक्षक शंकर सिंदरकर यांच्या पथकाने ३० आॅक्टोबर रोजी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या डोंबिवलीतील पलावा येथील घरांची झडती घेतली. याठिकाणी पुराव्यांचीही जुळवाजुळव करण्यात आली. मात्र, या झडतीमध्ये काय हाती लागले, याचा तपशील आताच जाहीर करता येणार नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. एकाच वेळी ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील दुकाने बंद करून हा सोन्याच्या दागिन्यांचा व्यापारी पसार झाला असल्याने त्याने नियोजनबद्धपणे हे केल्याचे उघड झाले असल्यामुळे अत्यंत सावधपणे तपासाची पावले उचलावी लागत असल्याचीही माहिती या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्सच्या विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवार आणि बुधवारी दिवसभरात ९२ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून आतापर्यंत १६५ तक्रारदारांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यातील एकाने तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची आणि स्वत:च्या नावाने दहा लाखांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘गुडविन ज्वेलर्स’गुंतवणुकदारांच्या फसवणूकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून नौपाडा पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर रोजी पूजा शेलार आणि त्यांच्या आई निलीमा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ ६८ तक्रारी दाखल झाल्या. तब्बल ७० तक्रारदारांची एक कोटी ५३ लाख ६७ हजारांची फसवणूक झाली. त्यानंतर २९ आणि ३० आॅक्टोबर या दोनच दिवसांमध्ये यात आणखी वाढ होऊन ९५ जणांनी तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारदारांची संख्या आता १६५ झाली असून त्यांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यामध्ये अब्राहिम यांची एकट्याचीच १५ लाखांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी स्वत:च्या नावाने दहा लाखांची तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची गुंतवणूक गुडविनमध्ये केली होती. याशिवाय, मंगेश मोकल यांची १३ लाख ५२ हजार, सुशांत थॉमस यांची १२ लाखांची, नरेंद्र आंबटकर यांची १२ लाख ६५ हजारांची फसवणूक आहे. हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुडविनच्या मीरा रोड, वाशी आणि वसई याठिकाणीही शाखा होत्या. तिथेही अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्याही संबंधित पोलीस ठाण्यात अथवा नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
‘‘हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असला तरी ठाण्यातील गुडविनबाबतची प्रत्येक तक्रारदाराची फिर्याद नौपाडा पोलीस ठाण्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष अर्जाचा नमुनाही तयार करण्यात आला आहे. हीच फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जात आहे. ’’
अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे