कामगारांअभावी दोन हजार कोटींचा आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:48 AM2020-06-21T00:48:33+5:302020-06-21T00:48:45+5:30
आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.
बदलापूर : सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगारांअभावी सध्या प्रचंड नुकसान होत आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्याने एमआयडीसीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.
अंबरनाथ एमआयडीसीत १ हजारापेक्षा अधिक कंपन्या असून तिथे जवळपास २५ हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावाला गेल्याने कामगारांची चणचण एमआयडीसीत निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल २ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती तायडे यांनी दिली. तर, दुसरीकडे मनसेने हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादीही संघटनेला दिली आहे.
>अंबरनाथ एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार हे परराज्यांतील असल्याने त्याचा थेट फटका कंपनीच्या उत्पादनाला बसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर कारखानदारांनी काम सुरू केले. मात्र, त्यांना हवे त्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच जे कामगार उपलब्ध आहेत, त्यांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीची साधने नसल्याने ही परिस्थिती अधिकच बिघडली आहे.