वाहतूकदारांच्या संपामुळे दोन हजार कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:27 AM2018-07-28T00:27:46+5:302018-07-28T00:28:39+5:30
कच्च्या मालाची टंचाई तर पक्का माल पडून
कल्याण : मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाची जबर झळ डोंबिवली परिसरातील कंपन्यांना बसली असून ४७५ कंपन्यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची वेळ आली आहे. कंपन्यांच्या नुकसानीची रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. याच न्यायाने ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांना किमान दीड ते दोन हजार कोटींचा फटका बसला असण्याची भीती आहे.
ई-वे विधेयकातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, या मागणीकरिता मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या संपाची झळ डोंबिवली परिसरातील औद्योगिक कंपन्यांना बसली आहे. संपामुळे कंपन्यांनी तयार केलेला माल संबंधितांना वेळेवर पोहोचलेला नाही. त्यामुळे दंड भरण्याची वेळ आली आहे. तसेच कंपनीला उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल येणे बंद झाल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. हा संप आता मिटला असला तरी, गत आठ दिवसांपासून संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यास विलंब लागेल, अशी भीती मालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ४७५ कंपन्यांना नेमका किती कोटी रुपयांचा फटका बसला आहे, त्याचा नेमका अंदाज सांगणे शक्य नसले, तरी ही रक्कम ५०० कोटींच्या घरात गेल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
‘कामा’ या कारखानदारांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी हे उद्योजक आहे. त्यांची इंजिनीअरिंग कंपनी डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात आहे. कुलकर्णी यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीतील उत्पादने छत्तीसगढ, रांची, झारखंड या ठिकाणी पाठवली जातात. दि. २० जुलैपासून मालवाहतूकदारांचा संप सुरू झाल्याने त्यांची उत्पादने जमशेदपूर येथे पोहोचली नाहीत. या उत्पादनाची किंमत २० ते २५ लाख रुपये आहे. जमशेदपूर येथे ही उत्पादने आजपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. वेळेवर उत्पादन न पोहोचल्याने संबंधित ग्राहक कंपनीकडून त्यावर दंड आकारण्यात आला आहे. कंपनीत लागणारा कच्चा माल कुलकर्णी गुजरातहून आणतात. जवळपास १७ ते २० लाख रुपये किमतीचा कच्चा माल त्यांनी विकत घेतला होता. हा कच्चा माल त्यांनी संपाच्या काळात वापरून उत्पादन केले. मात्र, आता त्यांच्याकडील कच्चा माल संपल्याने त्यांना पुन्हा कच्चा माल मागवण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी दरदिवसाचे उत्पादन कमी केले आहे.
शेकडो ट्रक रस्त्यातच थांबलेले
डोंबिवलीतील अनेक कंपन्यांचा माल २० तारखेपूर्वी निघाला. संपाला सुरुवात झाल्याने तो तळोजा लॉजिस्टिक येथे किंवा भिवंडीच्या गोडाउनमध्ये डम्प करण्यात आलेला आहे. काही ट्रक तर रस्त्यातच थांबवले आहेत. हे शेकडो ट्रक, ट्रेलर, कंटेनर हे तळोजा व भिवंडी येथेच आहेत.
मालवाहतूकदारांच्या संपाबाबत शुक्रवारी आठव्या दिवशी तोडगा निघाला. मात्र त्यासाठी विलंब लागल्याने उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत मोदी यांच्या सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे संपाकडे सुरूवातीला दुर्लक्ष झाले. त्यानंतर, मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलने महाराष्ट्रात सुरू झाली.
तोडगा काढण्यास विलंब
लोकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या संपावर तोडगा काढण्यावर सरकारकडून फारसे लक्ष दिले गेलेले नाही. या संपाची थेट झळ भाजीपाला व दूधवाहतुकीस बसली नसली, तरी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीमालकांना बसली आहे.
डोंबिवली तसेच अंबरनाथ व जिल्ह्यातील अन्य कंपन्यांनाही बसली आहे. यापूर्वी नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योजकांचे अगोदरच नुकसान झाले असताना आता संपामुळे त्यांचे कंबरडेच मोडण्याची वेळ आली आहे.