दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:49 PM2020-12-04T23:49:19+5:302020-12-04T23:49:42+5:30

सिद्धेश्वर तलाव परिसराचा क्लस्टर आराखड्यात समावेश 

Two thousand families will get their rightful home; Information of Narayan Pawar | दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती

दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती

googlenewsNext

ठाणे : महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे दोन हजार कुटुंबांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर आराखड्यात या परिसराचाही समावेश झाल्याबद्दल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ठाणे शहरात सिद्धेश्वर या तलावाभोवती झोपडपट्टीमध्ये दोन हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. अनेक वर्षांपासून या भागात ६० ते ७० जुन्या इमारती असून अनेक वर्षांपासून शेकडो कुटुंबे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत होता. 

मात्र, परिसराच्या झोपडपट्टीतील रहिवाशांना जुन्या घरातच राहावे लागत होते. या भागाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातूनही विकास करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर ठाण्यात क्लस्टर योजनेची चाचपणी सुरू झाल्यावर या परिसराचा तीत समावेशासाठी पवार यांनी प्रयत्न केले. अखेर, तीत सिद्धेश्वर तलाव परिसराचाही समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. 
सिद्धेश्वर परिसर यूआरपी क्र. ९ अनुसार, २१.५६ हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर उभारले जाईल. सुधारित प्रारूपमधील एकूण आरक्षित व रस्ता क्षेत्रासाठी ७.७८ हेक्टर जागा निश्चित केली आहे. 

काही वर्षांपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातील रहिवासी नव्या घरकुलांच्या प्रतीक्षेत होते. क्लस्टर योजनेत समावेश झाल्यामुळे त्यांना हक्काचे घर उपलब्ध होऊन अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल. - नारायण पवार,  नगरसेवक, भाजप

पाचपाखाडी परिसराचा विकास होत असतानाच आम्ही जुन्या घरांमध्येच वास्तव्य करीत होतो. अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे आम्ही पक्क्या घरांपासून वंचित होतो. मात्र, पवार यांच्या प्रयत्नांमुळे आता आम्हाला घर मिळू शकेल. - प्रकाश काळभोर, रहिवासी, सिद्धेश्वर तलाव परिसर

Web Title: Two thousand families will get their rightful home; Information of Narayan Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.