मुंबईतील १३ कामगारांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाण्याच्या वाहतूक शाखेने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:41 PM2020-04-22T20:41:58+5:302020-04-22T21:17:26+5:30
एकीकडे परराज्यातील मजूरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे तिथेच रहावे. त्यांची सर्व जबाबदारी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे मुंबईतून मालवाहू वाहनांमधून आपआपल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी मजूरांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशाच १३ मजूरांना दोन वाहनांमधून पळ काढतांना ठाण्याच्या वाहतूक शाखेने मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची आता निवारा केंद्रात रवानगी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबईतून कल्याणकडे जाणाऱ्या कंटेनरसह दोन वेगवेगळया वाहनांना ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले. यातील आठ कामागारांची नौपाडा येथील निवारा केंद्रात रवानगी केली असून दोन्ही वाहनांच्या चालकांना अटक केली आहे.
मुंबईतील गोरेगाव भागातून कल्याणकडे जाणा-या एका कंटेनरमधून आठ कामगारांना नेण्यात येत होते. तर गोवंडीतून कल्याणकडे जाणाºया लहान टेम्पोमधून पाच कामगारांना नेले जात होते. या दोन्ही वाहनांना ठाण्यातील नितीन कंपनीजवळ ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या गस्तीवरील पथकाने २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पकडले. पहिल्या कंटेनरमधून आठ कामगार हे मध्यप्रदेशात जाणार होते. ते या कंटेनरमधून कल्याणपर्यंत गेल्यानंतर तिथून अन्य वाहनाने ते जाणार होते. तर दुस-या फळे आणि भाजी घेऊन जाणाºया अत्यावश्यक सेवेतील टेम्पातून पाच कामगारही कल्याणला जाण्यासाठी टेम्पोमध्ये गोवंडीतून बसले होते. कोरोनामुळे केलेल्या संचारबंदीमध्ये रोजच्या जेवणाचे प्रचंड हाल होत असल्यामुळे आपण मुळगावी जात असल्याचे या कामगारांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा १८८ तसेच रोगराई पसरविण्यास मदत करण्याच्या कलम २६९ नुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून या सर्व कामगारांची नौपाडयातील निवारा केंद्रात तात्पूरती सोय केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.