जव्हारच्या दोन गावांना आता शुद्ध पाण्याचा ‘अमृतकलश’
By admin | Published: January 12, 2016 12:32 AM2016-01-12T00:32:54+5:302016-01-12T00:32:54+5:30
शहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे.
- अजित मांडके, ठाणे
शहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा गावातील ३०० घरांना आता २४ तास शुद्ध पाण्याची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अमृतकलश या योजनेच्या माध्यमातून येथील गावात ५ आणि ३ हजार लीटरच्या दोन टाक्या बसविल्या असून त्यातून येथील प्रत्येक कुटुंबाला अवघ्या दोन रुपयांत रोज २० लीटर शुद्ध पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामसभेने ठराव करूनच रोज दोन रुपये देण्याचे निश्चित केले आहे.
ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना आजही शुद्ध पाणी मिळत नसल्याने विहिरी, बोअरवेल अथवा झऱ्यांच्या पाण्यातून आपली पाण्याची तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे हागवण, डायरिया, उलट्या असे अनेक आजार येथील रहिवाशांना होत आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण हे अधिक आहे. परंतु, आता काही व्यावसायिक संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थांच्या मदतीने अशा ग्रामीण भागांना २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा या गावांतील ३०० घरांना अमृतकलशच्या माध्यमातून २४ तास शुद्ध पाणी मिळणार आहे.
या योजनेचा शुभारंभ आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यावसायिक संस्थेचे प्रमुख रवी राजपुरोहित आणि विजय भैलुमे यांच्यासह आमदार रूपेश म्हात्रे, कैलास लिंगायत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
असे मिळणार
शुद्ध पाणी...
येथील बोअरवेलमधील पाणी उचलले जाऊन ते जलशुद्धीकरण केंद्रात सोडले जात आहे. त्यानंतर, त्यावर प्रक्रिया करून ते येथील टाकीत सोडण्यात येत आहे. त्यानंतर, प्रत्येक कुटुंबाला दिलेले एटीएमकार्ड स्वॅप केल्यानंंतर प्रत्येक दिवसाला २० लीटर शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे.
दरदिवशी २ रुपये
मोजावे लागणार
या योजनेची देखभाल आणि दुरुस्ती ही गावातील मंडळीकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीचा खर्च निघावा म्हणून दरदिवशी प्रत्येक घराला दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनीदेखील त्याला मंजुरी दिल्याने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे अगदी माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध झाले असून मुंबई, ठाण्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.