मध्यप्रदेशातील दोन वॉन्टेड खून्यांना ठाण्यातून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: May 15, 2019 11:35 PM2019-05-15T23:35:31+5:302019-05-15T23:40:14+5:30
एका खून प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या दोन खून्यांना ठाणे आणि मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे. १५ लाखांच्या खंडणीसाठी एका मुलाचे त्यांनी अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणाच्या तपासातून त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे: मध्यप्रदेशात खून करुन पसार झाल्याने दहा हजारांचे बक्षिस जाहिर झालेल्या पुष्पेद्रसिंह परमार (३१, रा. दिवा, ठाणे) आणि शिवम सिंग (२२, रा. दिवा, मुळ रा. दोघेही मंध्यप्रदेश) यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश राज्यातील दतिया पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपहरण झालेल्या मुलाचा आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांचे पथक ठाण्यात आले होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाला मदतीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेमले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिवा रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या पुष्पेद्रसिंह परमार (रा. ओमसाई चाळ, रुम क्र. १६, दिवा रेल्वे स्थानक) आणि शिवम सिंग (रा. सुरेश अपार्टमेंट, रुम क्र. ३०४, दिवा रेल्वे स्टेशन जवळ) यांची शोध मोहीम घेऊन या दोघांना ११ मे रोजी दिवा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. दवोह पोलीस ठाणे (मध्यप्रदेश) याठिकाणी दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल असून दोघेही गेल्या वर्षभरापासून वॉन्टेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी दहा हजारांचे बक्षिस मध्यप्रदेश सरकारने जाहिर केले होते. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना ठाणे न्यायायालयातून ट्रान्सिस्ट कस्टडी घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, उपनिरीक्षक कैलास सोनावणे आणि हवालदार प्रकाश कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
..........................
१५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण!
मध्यप्रदेशातील दतिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील राजप्रताप चौव्हाण (१६) या मुलाचे अलिकडेच अपहरण झाले आहे. त्याच्या अपहरणानंतर राजप्रतापचा मामा असलेल्या पुष्पेंद्रसिंह याने आपल्याच मेव्हण्याकडे (राजप्रतापच्या वडीलांकडे) १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. याची तक्रार दतिया पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. ज्या मोबाईलद्वारे ही खंडणीची रक्कम मागण्यात आली, त्या क्रमांकाच्या आधारे उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांनी ठाण्यापर्यंतचा माग काढला. त्यानंतर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाच्या मदतीने या दोघांनाही उचलण्यात आले. आता त्यांनी ज्याचे अपहरण केले त्या राजप्रताप याचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यांनी हे अपहरण केले की नाही, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकट
याच अपहरणाच्या आधी म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये नरेंद्र परमार, पुष्पेंद्रसिंह परमार आणि शिवम या तिघांनी मिळून भेंड जिल्हयातील देवरी गावात एका वादातून अजय दुबे (२७) याच्यावर गोळीबार करुन खून केला होता. या खूनानंतर गोळीबार करणारा नरेंद्र याला पोलिसांनी अटक केली होती. तो अद्यापही कारागृहात आहे. तर पुष्पेंद्रसिंह आणि शिवम हे दोघे मात्र तेंव्हापासून फरार झाले होते. आता खंडणी आणि अपहरण प्रकरणामुळे ते ठाणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा हाती लागल्याचे दवोह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नविन यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.