टीएमटीचे दोन मार्ग कायमचे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:46 AM2019-06-13T00:46:19+5:302019-06-13T00:46:48+5:30

अत्यल्प उत्पन्नामुळे घेतला निर्णय : डोंबिवलीसह विटाव्याचा समावेश

Two way TMT permanently closed | टीएमटीचे दोन मार्ग कायमचे बंद

टीएमटीचे दोन मार्ग कायमचे बंद

Next

ठाणे : आधीच डबघाईला आलेल्या परिवहन सेवेने आता अत्यल्प उत्पन्न देणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम आणि किसनगर ते विटावा हे दोन महत्त्वाचे मार्ग बंद करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. हे दोन्ही मार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्याचा दावा परिवहनने केला असून दोन वर्षानंतर त्यांना हे शहाणपण सुचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १६ जूनपासून हे दोन्ही मार्ग बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी जास्तीचे उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसेस वळत्या केल्या जाणार आहेत.

परिवहनचे रोजचे उत्पन्न हे २८ ते २९ लाखांच्या घरात आहे. परिवहनचे १०४ मार्ग आहेत. त्यातील उत्पन्न देणारे आणि कमी उत्पन्न देणारे मार्ग कोणते, यावर आजही सर्व्हे सुरू आहे. परिवहनची ही परिस्थिती असताना तब्बल दोन वर्षानंतर प्रशासनाला जागा आली असून त्यांनी अत्यल्प उत्पन्न देत असलेल्या चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली (पश्चिम) आणि किसनगर ते विटावा हे दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील किसनगर ते विटावा हा मार्ग जानेवारी २०१७ मध्ये आणि चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली हा मार्ग मार्च २०१७ मध्ये सुरू केला होता. सुरुवातीला या बसला प्रवाशीच मिळत नव्हते. कालांतराने प्रवाशांची संख्या वाढेल अशी आशा होती. परंतु, त्यांची ती फोल ठरली. डोंबिवलीला जाण्यासाठी परिवहनच्या सात बसेस ठेवण्यात आल्या होत्या. या बसच्या दिवसभरात २८ फेºया होत होत्या. परंतु, २८ फेऱ्यांमधून केवळ ६० ते ७० प्रवाशीच प्रवास करीत असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर किसनगर ते विटावा या मार्गावर ४ बसच्या दिवसाला ८ फेºया होत होत्या. या बसेसमधूनही रोज केवळ ५० ते ६० प्रवाशीच प्रवास करीत होते. यामुळे हा मार्ग तोट्यात असल्याचे शहाणपण परिवहन प्रशासनाला सुचले आणि हे दोन्ही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीला ट्रेनचा प्रवास सोयीचा आहे. रेल्वेचे तिकीट कमी आणि वाहतूककोंडी नाही. या कारणांमुळेच प्रवाशांनी परिवहनकडे पाठ फिरवली. किसनगर ते विटावा हासुद्धा लांबचा पल्ला असल्याने वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळेच हा मार्गही बंद करावा लागत आहे.

आनंदनगर ते ठाणे स्टेशन धावणार बस
चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली आणि किसनगर ते विटावा हे दोन्ही मार्ग बंद केल्यानंतर त्या मार्गावरील बस आता घोडबंदर मार्गावर धावणार आहेत. आनंद नगर ते ठाणे स्टेशन (पश्चिम) असा या बसेसचा मार्ग असणार आहे.

अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने आणि प्रवाशांची संख्यासुद्धा कमी असल्याने हे दोन्ही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या मार्गावरील बस जास्तीचे उत्पन्न आणि प्रवासी देणाºया मार्गावर धावणार आहेत.
- संदीप माळवी, व्यवस्थापक,
परिवहन सेवा, ठाणे

Web Title: Two way TMT permanently closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.