धावत्या लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूमुळे दोघी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:48 AM2019-06-23T06:48:45+5:302019-06-23T06:48:59+5:30
ठाणे रेल्वेस्थानकाचा फलाट सुटल्यानंतर डोंबिवली लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूचे तुकडे लागून डोंबिवलीतील दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली.
ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा फलाट सुटल्यानंतर डोंबिवली लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूचे तुकडे लागून डोंबिवलीतील दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली. या घटनेनंतर त्या दोघींनी तक्रार देण्यास नकार दिल्याने अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी नोंद करून वस्तू फेकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
शुक्रवारी रात्री सीएसएमटी ते डोंबिवली ही लोकल ठाण्यातून सुटली. त्याचदरम्यान तिच्या महिला डब्यावर अनोळखी व्यक्तीने फेकलेली टणक वस्तू त्या डब्यातील खांबावर जाऊन आदळून तिचे तुकडे होऊन ते त्या डब्यात उडाले. त्यातील काही तुकडे डोंबिवलीतील आशा पाटील (३२), सुष्मिता गावकर (२४) या दोघींना लागले. यामध्ये आशा यांच्या डोक्याला, तर सुष्मिता यांच्या हाताला जखम झाली. त्या दोघींना कळवा रेल्वेस्थानकात उतरवून लोहमार्ग पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्या झालेल्या प्रकाराबाबत दोघींनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी त्याची नोंद करून त्याचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन असे प्रकार घडू नये, यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पेट्रोलिंगसाठी पथक तैनात केले आहे. तसेच अशा प्रकारे ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सांगितले.
उपचारास नकार
जखमींना लोहमार्ग पोलिसांनी ठामपा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी दोघींना जे.जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊन उपचार करण्यास नकार दिला. लोहमार्ग पोलिसांनी उपचार केले नाही, तर आरोग्यमंत्र्यांना फोन लावतो, असे सांगितल्यावर त्या डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले.