दुचाकीस्वारांचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:02 AM2018-05-25T01:02:06+5:302018-05-25T01:02:06+5:30
दोन मद्यपी भावांना अटक : नौपाडा पोलिसांची कारवाई
ठाणे : विनाहेल्मेट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह दोघा पोलिसांवर हल्ला करून शिवीगाळ करणाºया धीरज (२६) आणि प्रशांत सोमाजी (२६, रा. दोघेही पारशीवाडी, कोपरी, ठाणे) या दोघा मद्यपी भावांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस शिपाई अमोल पवार आणि एन.एस. थोरवे हे नितीन कंपनीजवळ बुधवारी रात्री कर्तव्यावर होते. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी ते नितीन कंपनीच्या दिशेने विनाहेल्मेट धीरज, प्रशांत, रवींद्र तायडे हे तिघे दुचाकीवरून आले. कॉन्स्टेबल पवार यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबविल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केल्याचा पोलिसांना संशय आला.
पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी त्यांची श्वासविश्लेषकाद्वारे मद्य चाचणी केल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यांना वाहतूक पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला. याचा राग आल्याने धीरज, प्रशांत या दोन भावांनी मांगले यांच्यासह कॉन्स्टेबल पवार यांना शिवीगाळी, धक्काबुक्की करत हल्ला केला.