ठाण्यात रस्त्यावर तेल सांडल्याने दुचाकी घसरली; युवकाच्या पायाला लागला मार
By जितेंद्र कालेकर | Published: April 6, 2023 05:31 PM2023-04-06T17:31:02+5:302023-04-06T17:31:19+5:30
कळवा खाडीवरील तिसरा आणि नवीन उड्डाणपूलावरील राबोडी कडून विटाव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी वाहनातून तेल सांडले होते
ठाणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रस्त्यावर काही वाहनांमधून तेल सांडण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारीही सकाळी नवीन कळवा उड्डाणपूलावरील रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून दुचाकीस्वार ऋषिकेश गाडेकर (२४) हा तरुण घसरुन जखमी झाला.
त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. कळवा खाडीवरील तिसरा आणि नवीन उड्डाणपूलावरील राबोडी कडून विटाव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी वाहनातून तेल सांडले होते. याचदरम्यान नौपाड्यातील जखमी ऋषिकेश हा तरुण काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी सांडलेल्या तेलावरून त्याची दुचाकी घसरली आणि तो रस्त्यावर पडला. यावेळी त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच जखमी ऋषिकेश याला रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी अंदाजे ५०० ते ६०० मीटर अंतराच्या रस्त्यावर सांडलेल्या तेलावरती माती टाकण्यात आली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.