दोन महिला आरोपींची अटक ठरविली अवैध, ठाणे पोलिसांना दुसरा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:37 AM2018-04-04T05:37:41+5:302018-04-04T05:37:41+5:30
पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाºया दोन महिलांना मुंब्रा पोलिसांनी केलेली अटक न्यायालयाने शनिवारी अवैध ठरवली. या दोन्ही महिलांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजिकच्या काळात सलग दोनवेळा पोलिसांना अशी नामुष्की सहन करावी लागली.
ठाणे - पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाºया दोन महिलांना मुंब्रा पोलिसांनी केलेली अटक न्यायालयाने शनिवारी अवैध ठरवली. या दोन्ही महिलांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजिकच्या काळात सलग दोनवेळा पोलिसांना अशी नामुष्की सहन करावी लागली.
मुंब्रा येथील मुस्तफा चाळीमध्ये ३१ मार्च रोजी दोन शेजाºयांमध्ये वाद झाला. दिलनशीन फातिमा सैय्यद ह्या या प्रकरणाची तक्रार घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांच्यासोबत दुसरी शेजारी महिला दिलशाद खान आणि फातिमा शेख यादेखील पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांना त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यावरून पोलीस ठाण्यात वाद झाला. दिलशाद खान आणि फातिमा शेख यांनी ठाणे अंमलदाराशी हुज्जत घालून, एका महिला शिपायास शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या आरोपाखाली पोलिसांनी दोन्ही महिलांविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल भादंविचे कलम ३५३ आणि ५0४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पी.एल. गुप्ता यांच्या न्यायालयासमोर हजर केले. यावेळी आरोपींच्या अटकेस त्यांच्या वकिलांनी विरोध दर्शविला. आरोपींच्या अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन पोलिसांनी केले नाही. आरोपींना अटक करण्यापूर्वी भादंविच्या कलम ‘४१अ आणि ४१ड’ची पूर्तता पोलिसांनी केली नाही. आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची तातडीने सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आरोपींच्या अटकेसंदर्भात सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा तपास अधिकाºयाने न्यायालयासमोर केला. परंतु, तसा पुरावा सादर करण्यास तपास अधिकारी अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपींची अटक अवैध ठरवली. आरोपींची अटक अवैध असली तरी त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गुंडाळण्याचे किंवा तपास थांबवणे आवश्यक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात सीडीआर प्रकरणात वकील रिझवान सिद्दीकी यांना पोलिसांनी १६ मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या अटकेबाबतही भादंविच्या कलम ‘४१अ’मध्ये नमुद केलेल्या तरतुदींचे पालन पोलिसांनी केले नसल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय कामात अडथळा आणणाºया दोन्ही महिला आरोपींची सुटका करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आवश्यकेनुसार आरोपींविरुद्ध कारवाई नक्की केली जाईल.
- किशोर पासाळकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
मुंब्रा पोलीस स्टेशन