दोन महिलांनी घातला प्रांत कार्यालयात गोंधळ; आत्मदहनाचीही दिली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 04:21 PM2022-04-01T16:21:16+5:302022-04-01T16:25:01+5:30
कल्याण : मुंबई-वडोदरा महामार्गासाठी कल्याण तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा दावा करीत बाधित कुटुंबातील ...
कल्याण : मुंबई-वडोदरा महामार्गासाठी कल्याण तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा दावा करीत बाधित कुटुंबातील दोन महिलांनी बुधवारी कल्याण प्रांत कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा इशारा देत गोंधळ घातला.
मुंबई-वडोदरा महामार्गात कल्याण तालुक्यातील आपटी तर्फे बाहे या गावातील जमीन बाधित होत आहे. या प्रकल्पातील बाधितांना मोबदला दिला गेला होता. त्यापैकी एका व्यक्तीच्या मोबदल्यावर दोन महिलांनी हक्क सांगितला. मोबदल्याची रक्कम ९ लाख ८८ हजार रुपये होती. त्यापैकी प्रत्येक महिलेस दोन लाख रुपये देण्याचे प्रशासनाकडून मान्य करण्यात आले; मात्र ही रक्कम स्वीकारण्यास महिलांनी नकार दिला. या दोन्ही महिलांनी बुधवारी कल्याणचे प्रांताधिकारी अभिजित भांडे-पाटील यांचे कार्यालय गाठले. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही होती. त्यांनी कार्यालयात गोंधळ घातला. तसेच योग्य मोबदला मिळाला नाही, तर कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
दोन्ही महिलांचा विचार करून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यास आम्ही तयारी दर्शविली; मात्र त्यांना ती रक्कम मान्य नाही. हा वाद चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु या महिला ऐकून घेत नसल्याने मोबदल्याचा दिलेला धनादेश स्थगित करण्याचे आदेश दिले. तशा आशयाचे पत्र पोलीस ठाण्यास दिले आहे. बाधितांची एकत्रित सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल.
- अभिजित भांडे-पाटील, प्रांताधिकारी, कल्याण