कुंटणखान्यातून केली दोन महिलांची सुटका
By admin | Published: August 30, 2015 09:30 PM2015-08-30T21:30:03+5:302015-08-30T21:30:03+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत
ठाणे: गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी अनिता मराठे (३८) आणि नलिनी शशीकुमार (५२) या दोघींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने २८ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास ही कारवाई केली. अनिता ही शरीरसंबंधासाठी महिलांची मागणी करणाऱ्या ग्राहकांना तरुणींचा पुरवठा करीत होती. त्याबदल्यात पैसे स्वीकारुन नलिनी ही तिच्या शांतीनगरच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात ‘त्या’ तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक शेख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आय. शेख, उपनिरीक्षक पी. एस. ठाकूर, शरद पंजे, पी. एस. घाडगे, कल्याणी पाटील, हवालदार सातपुते, शेळके आदींनी धाड टाकून दोन पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पाच हजारांची रोकड आणि मोबाईल असा सहा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. श्रीनगर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)