अत्याचाराचा व्हिडीओ काढून खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोन अत्याचार करणा-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:44 PM2018-07-16T14:44:36+5:302018-07-16T14:47:23+5:30
भिवंडी: प्रियकराने जवळ केलेल्या तरूणीस दूर करण्याच्या हेतूने त्याच्या प्रेयसीने गुंगीचे पाणी पाजून त्या तरूणीवर दुस-याकरवी अत्याचार करवीला. या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणा-या त्या प्रेयसीसह पिडीत तरूणीवर अत्याचार करणा-या दोन तरूणांसह व्हिडीओ काढणा-या तरूणीस पोलीसांनी अटक केली आहे.
शहरातील गायत्रीनगरमध्ये रहाणा-या काकीकडे मुंबईतील कफपरेड येथे रहाणारी २२वर्षाची तरूणी वरचेवर सुट्टीच्या काळात येत होती. त्यावेळी गायत्रीनगर मधील सतीश उर्फ भीमराव नकलवार याच्याशी तीचे प्रेमसंबध जुळले. त्याच्या बरोबर फिरण्याच्या बहाण्याने त्यांचे शारिरीक संबध आले. मात्र सतीशचे लग्न होऊन त्यास दोन मुले असल्याचे समजल्यावर पिडीत तरूणी त्याच्यापासून दूर राहू लागली. तरी देखील तीच्यावर त्याने वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान पिडीत तरूणी गरोदर झाल्याने तीला फसवून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. अशा घटना तीन वर्षात वारंवार घडल्या. दरम्यान ही घटना सतीशची प्रेयसी राबीया हिला कळाली. तेंव्हा राबीयाने सतीशपासून पिडीत तरूणीला दूर करण्याच्या हेतूने त्या पिडीत तरूणीला आपल्या घरी बोलावीले आणि पाण्यातून गुंगीचे औषध टाकून पिण्यास दिले.पाणी प्यायल्यानंतर बेशुध्द झालेल्या तरूणीवर परिसरांतील सलीम यास अत्याचार करण्यास लावले. त्या कृत्याचे राबीयाने मोबाईलव्दारे व्हिडीओ शुटींग केले. ते व्हिडीओ शुटींग राबीयाने पिडीत तरूणीस दाखवित तीच्याकडून ५० हजाराची मागणी केली. त्यापैकी तीने ४३ हजार रूपये राबीयाला दिले. परंतू तीची मागणी वाढत गेल्याने समाजात आपली बदनामी होईल या भितीने तीने खडवलीच्या नदीत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापासून तीला मैत्रीणीने परावृत्त करून त्यांनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस अधिका-यांनी केलेल्या मार्गदर्शनाने पिडीत तरूणीने शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलीसांनी सतीस उर्फ भीमराव नकलवार,सलीम मोईन खान व राबीया या तिघांना अटक केली आहे.त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.