टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, दोघांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:41 AM2022-03-28T08:41:40+5:302022-03-28T08:42:49+5:30
ठाण्यातील घटना : दोघांचे प्राण वाचविण्यात यश, स्वच्छता करताना रसायनाच्या वासाने श्वास कोंडला
ठाणे : पाचपाखाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र मराठा मंडळाच्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीची सफाई करताना विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवणकर (३०) या दोन कामगारांचा रसायनाच्या (एसबी-२) वासाने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नौपाड्यातील हरिनिवास सर्कलजवळ मोनालिसा इमारतीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र मराठा मंडळाची तळ अधिक तीन मजली इमारत आहे. याच इमारतीमधील २५ फूट खोल पाण्याची टाकी साफ करण्यासाठी रविवारी विवेक कुमार याच्यासह चौघे कामगार उतरले होते. नीलेश ताम्हाणे या ठेकेदाराने बाबर या सुपरवायझरच्या देखरेखीखाली त्यांचे हे काम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झाले होते. पाण्याची टाकी साफ करताना वॉटर प्रुफिंगसाठी बीएसएफ कंपनीचे एसबी -२ हे रसायन त्यांनी वापरले. त्याच्याच वासाने टाकीमध्ये त्यांचा श्वास कोंडला.
यात चौघेही बेशुद्ध पडले. अर्धवट शुद्धीत असलेल्या दाेघांनी आरडाओरडा केला. ही माहिती मराठा सेवा मंडळाकडून मिळाल्यानंतर नाैपाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजध धुमाळ, रामचंद्र वळतकर आणि सहायक पेालीस निरीक्षक योगेश लामखेडे आदींच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने या चौघांपैकी गणेश नरवणकर आणि मिथुन ओझा यांना बाहेर काढले. त्यांच्यावर तातडीने डॉ. उमेश आलेगावकर यांनी उपचार केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत बाहेर काढलेले विवेक आणि योगेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. टाकीत उतरलेल्या या चारही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. त्यानंतर ही माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच त्यांनी बचावकार्य केल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात धावपळ सुरु होती. कामगारांची काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांनी ठेकेदारावर संताप व्यक्त केला. ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.
पोलीस आणि डॉक्टरांची तत्परता..
या दुर्घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांसह खासगी रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर तिथे पोहोचले. त्यांनी तातडीने उपचार केल्यामुळे सुरुवातीला टाकीतून बाहेर काढलेल्या गणेश आणि मिथुन या दोघांचे प्राण वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली. एरवी संबंधित यंत्रणा वेळेत पोहचू न शकल्याने संताप व्यक्त केला जातो. पण या घटनेत पोलीस, डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल येथील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.