कुत्र्याच्या हल्ल्यात दोन वर्षांचा मुलगा जखमी , उल्हासनगरची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:28 AM2018-02-03T04:28:04+5:302018-02-03T04:28:15+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षांचा कुणाल निकम हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे.
उल्हासनगर : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षांचा कुणाल निकम हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी या कुत्र्याला मारून टाकले.
उल्हासनगर कॅम्प नं. ५, हिललाइन पोलीस ठाण्यामागे कुणाल विनोद निकम हा राहतो. गुरुवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने घरासमोर उभ्या असलेल्या कुणालवर अचानक हल्ला केला. यात कुणाल गंभीर जखमी झाला असून, त्याला शहरातील खासगी, तसेच मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रेबीज उपचाराची सोय नसल्याने तेथून केईएम रुग्णालयात नेले. बेशुद्ध कुणालवर उपचार सुरू आहेत.
या कुत्र्याने आणखी सहा जणांचा चावा घेतल्याचे उघड झाले. तर मेलेल्या कुत्र्याचे शवविच्छेदन करणार असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागातून देण्यात आली.
पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी सांगितले की, एका वर्षापूर्वी २ हजारांपेक्षा अधिक श्वानांची नसबंदी केली, तसेच रेबीजचे इंजेक्शन महापालिका मध्यवर्ती रुग्णालयासह आरोग्य केंद्रात दिले जाते. या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला अपयश आल्याची टीका होत आहे.
महिन्याला ४०० जणांना चावा
शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात दरमहा चारशेपेक्षा अधिक लोकांचा कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे. रात्री १० नंतर कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरत असतात. पालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीऐवजी त्यांना पकडून जंगलात सोडायला हवे, अशी मागणी अपंग सेवा संघटनेचे भरत खरे यांनी केली आहे.