दोन वर्षांपासून फरार जन्मठेपेच्या कैद्यास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:35 AM2017-08-17T05:35:33+5:302017-08-17T05:35:35+5:30
कोल्हापूरमधील कळंबा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर दोन वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेच्या कैद्यास ठाणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
ठाणे : कोल्हापूरमधील कळंबा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर दोन वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेच्या कैद्यास ठाणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या कैद्यास तूर्तास ठाणे कारागृहामध्ये बंदिस्त करण्यात आले आहे.
किसननगर भागात राहणाºया सुनील कुºहाडे याने सहा वर्षांपूर्वी शिवशंकर जयस्वाल यांचा खून केला. यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असताना ११ सप्टेंबर २०१५ रोजी त्याला एक महिन्याची रजा मंजूर झाली. त्यानुसार, १२ आॅक्टोबरला कारागृहात परतणे अपेक्षित होते; परंतु तो न परतल्याने पोलिसांनी शोध सुरू केला. २६ डिसेंबर २०१५ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी त्याच्या घरावर काही दिवस पाळत ठेवली. मंगळवारी पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकत त्याला शिताफीने अटक केली.