दोन वर्षांचा मेहनताना हिशेबाअभावी रखडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:28 AM2018-10-15T00:28:34+5:302018-10-15T00:28:44+5:30
ठाणे : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शाळांना त्यांचा मोबदला म्हणजे ‘मेहनताना’ शुल्क सुमारे आठवडाभरात ...
ठाणे : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शाळांना त्यांचा मोबदला म्हणजे ‘मेहनताना’ शुल्क सुमारे आठवडाभरात शासनाकडून मिळणार आहे. याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ४०० शाळांना होणार असून यातून त्यांचा १८ लाख रुपयांचा फायदा होईल. यासाठी संबंधित शाळांकडून १६ आॅक्टोबरपर्यंत माहिती मागवण्यात आली. पण, जिल्ह्यातील या शाळांच्या सुमारे दोन वर्षांच्या रकमेच्या हिशेबांचा ताळमेळ बसत नाही. यावरून माध्यमिक शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी, लिपिक एकमेकांवर आगपाखड करत आहेत.
जिल्ह्यातील शाळांना सुमारे दोन वर्षांपासून ही मेहनताना रक्कम मिळालेली नाही. शाळांच्या या मेहनताना रकमेची शिक्षण उपसंचालकांकडील माहिती आणि येथील शिक्षण विभागाकडील शाळांची माहिती आदींचा दोन वर्षांच्या हिशेबाचा ताळमेळ बसत नाही. पण, आता ही रक्कम द्यायची असल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. यासाठी येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी संबंधित अधिकाºयांसह लिपिकांचीदेखील सुनावणी घेतली आहे. १६ आॅक्टोबरपर्यंत शाळांचीही माहिती द्यायची जबाबदारी आता संबंधितांवर सोपवली आहे. मात्र, हिशेबाचा ताळमेळ बसणे अपेक्षित आहे. तरच, शाळांना यावेळी मेहनताना मिळणार आहे.
अकरावीसाठीचा आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठीच लाखो रुपयांचा मेहनताना मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत सर्व शाळांना याआधीच मिळाला आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील शाळांना या मेहनतान्याची रक्कम आजवर मिळाली नव्हती. शाळांची ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडून ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठीदेखील सतत पाठपुरावा केला. आता पुढील आठवड्यात ही मेहनतान्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा शिक्षण चळवळीचे नेते अनिल बोरनाडे यांनी केला. त्यात विलंब झाल्यास पुढील वर्षी या कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शासनास दिल्याचे बोरनाडे यांनी स्पष्ट केले.