शरीरविक्रयाच्या व्यवसायातून दोन तरुणींची सुटका
By Admin | Published: April 10, 2017 05:44 AM2017-04-10T05:44:59+5:302017-04-10T05:44:59+5:30
पैशांचे आमिष दाखवून तरुणींना शरीरविक्रयास लावणाऱ्या रोशनी थापा हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून तरुणींना शरीरविक्रयास लावणाऱ्या रोशनी थापा हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. तिच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटकाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका ठरावीक दूरध्वनी क्रमांकावर मुलींना शरीरविक्रयासाठी पुरवण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाण्याच्या जांभळीनाका येथील एका हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्या पथकाने सापळा लावून रोशनीच्या ताब्यातून १९ आणि २० वर्षीय पीडित तरुणींची ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सुटका केली. शरीरविक्रयाच्या बदल्यात ती प्रत्येकीचे अडीच हजार रुपये घ्यायची. त्यातील एक हजार रुपये प्रत्येकी या मुलींना देऊन ती आपली उपजीविका करीत असल्याचे चौकशीत उघड झाले. ती गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचा व्यवसाय वेगवेगळ्या मुलींकडून करून घ्यायची. चांगले काम मिळवून देण्याच्या आमिषाने तिने शरीरविक्रयात अडकवल्याची माहिती पीडित मुलींनी पोलिसांना दिली. ठाणेनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशनीला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)