अंधारात अडकलेल्या २ तरुणांची सातपाटी-शिरगावमधील दोन जिगरबाज तरुणांनी केली सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 02:47 PM2022-01-23T14:47:24+5:302022-01-23T14:47:36+5:30
पालघर पूर्वेकडील नवली भागातील 6 मुले शुक्रवारी संध्याकाळी शिरगाव बीचवर खूबऱ्या(शंख)वेचायला गेले होते.
- हितेंन नाईक
पालघर- शिरगाव(उसबाव)च्या समुद्र किनारी शंख शिंपल्याच्या शोधार्थ फिरत असताना उधाणाच्या पाण्याच्या चक्रव्यूहात अडकुन नाका-तोंडा पर्यंत पाणी जाऊन बुडण्याच्या अवस्थेत एका खडकावर जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या नवली(पालघर)मधील दोन 18-20 वर्षीय तरुणांचे जीव वाचविण्यात सातपाटी-शिरगाव मधील मच्छिमार प्रितम मेहेर आणि संदीप पाडेकर याना यश आले.जीव वाचलेली दोन्ही मुले आपल्या कुटुंबातील एकुलती एक अपत्ये आहेत.
पालघर पूर्वेकडील नवली भागातील 6 मुले शुक्रवारी संध्याकाळी शिरगाव बीचवर खूबऱ्या(शंख)वेचायला गेले होते. दोन गटात विभागलेल्या ह्या तरुणांना खडकात सापडत असलेले नानाविध खेकडे,मासे,शिंपले त्यांना आकर्षित करीत होते.त्यांच्या शोधार्थ ओमकार घरत आणि रोहन भैसकर ही 20 वर्षीय तरुण खूबऱ्याच्या शोधार्थ दूरवर निघून गेले. ह्यावेळी अंधार दाटून आल्याने त्यांनी घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी केली असता आपल्याला चोहोबाजूंनी उधानाच्या पाण्याने घेरल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी अनेक भागातून किनाऱ्यावर पोहचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी आपल्या जवळील मोबाईल वरून आपल्या सहकाऱ्यांना संपर्क साधला. मात्र नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
दोन्ही तरुणांनी पोहता येत नसल्याने आपला जीव वाचविण्यासाठी एका उंच दगडावर उभे राहत मोबाईल मधील बॅटरीच्या सहाय्याने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.परंतु रात्र झाल्याने निर्मनुष्य असलेल्या ह्या भागातून मदत मिळण्याचे त्याचे प्रयत्न फोल ठरले. ह्याच वेळी त्याचे चार मित्र आपल्या घरी गेल्यावर आपल्या सोबत गेलेले दोन मित्र अजून घरी पोहचले नसल्याचे त्यांना कळले.तात्काळ त्यांनी आपल्या अन्य मित्र आणि नातेवाईकासोबत पुन्हा शिरगाव चा किनारा गाठल्यावर मोबाईल च्या बॅटरीच्या सहाय्याने समुद्रात दूरवर आपले मित्र मदत मागत असल्याचे त्यांना दिसले परंतु सर्वत्र पसरलेला अंधार आणि समुद्राच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे ते त्याच्या पर्यंत मदत पोचविण्यात अपयशी ठरले.
सातपाटी मधील प्रीतम मेहेर व त्याचे भावोजी संदीप पाडेकर हे दोघे आपल्या होडीतून मासेमारी साठी उसबाव च्या समुद्रात उभे होते.आपले वावरी नावाचे जाळे त्यांनी समुद्रात टाकून ते त्या जाळ्याला लागलेले मासे काढीत असताना त्याचे लक्ष दूरवरून मदती साठी कोणीतरी इशारे करीत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आपले जाळे तसेच समुद्रात सोडून आपली होडी त्या दिशेने वळविली.त्यावेळी दोन तरुण खडकावर आपटल्याने जायबंदी अवस्थेत एका खडकावर उभे असून त्याच्या नाका-तोंडात पाणी जाऊन अर्धमेल्या अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे दिसले.
दोन्ही मच्छिमार तरुणांनी तात्काळ पाण्यात झेप घेत एकेक करीत त्यांना आपल्या छोट्याश्या होडीत घेतले.आपल्या छोट्याश्या होडीत चार लोक बसू शकणार नाहीत हे त्याच्या लक्षात आल्यावर वादळी हवामान आणि बोचरी थंडी ह्या अवस्थेत त्या दोन्ही जिगरबाज मच्छिमार तरुणांनी स्वतः पोहत आपल्या होडीतून त्यां दोघांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.आपले मित्र सुखरूप असल्याचे पाहिल्यावर सर्वांनी देवदूत बनून आलेल्या दोन्ही जिगरबाज मच्छिमार तरुणांचे मनःपूर्वक आभार मानीत त्यांना कडकडून मिठी मारली.