पाण्याच्या भाेवऱ्याने केला दोन तरुणांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:58+5:302021-07-24T04:23:58+5:30
कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील चिंचवली परिसरातील नदीत तीन तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला ...
कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील चिंचवली परिसरातील नदीत तीन तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली. एनडीआरएफच्या पथकाने इशांत मोहाडीकर (१८) आणि विनायक परब (२०) यांचे मृतदेह बाहेर काढले.
इशांत व विनायक हे नकुलसह नदीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, नकुलला पाेहता येत नसल्याने तो नदीच्या पाण्यात उतरला नाही. इशांत व विनायकने पाण्यात उडी घेतली. पाण्याचा प्रवाह जास्त जोरात असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही पाण्याच्या प्रवाहात खेचले गेले. ते बुडत असल्याचे पाहून नकुलने आरडाओरडा केला. त्यावेळी ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी हिललाइन पोलिसांनाही पाचारण केले. या भागातील उपसरपंच नीलेश म्हात्रे यांनी पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले गेले. पथकाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधून काढण्यात आले. विनायक व इशांत हे मुंबईतील कॉलेजमध्ये शिकत होते. नुकतीच त्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. गुरुवारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी ते गावात आले होते. वाहत्या पाण्यात पाण्याचा भोवरा तयार झाल्यावर त्यात पट्टीचा पोहणाराही उडी घेत नाही. मात्र, इशांत आणि विनायकला पाण्यातील भोवरा समजून आला नाही. त्यामुळे त्यांचा घात झाला.
------------------------------