चाळीच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, हाडे, डोंबिवली पूर्वेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:40 AM2019-06-24T00:40:02+5:302019-06-24T00:40:41+5:30
डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील पांडुरंग केणे चाळीला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, कातडी आणि हाडे सापडल्याने रहिवाशांना धक्का बसला आहे.
कल्याण - डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील पांडुरंग केणे चाळीला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, कातडी आणि हाडे सापडल्याने रहिवाशांना धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची ही फ्री मटेरियल सेवा चर्चेचा विषय ठरली आहे.
पांडुरंग केणे चाळीत राहणारे समीर पाटील म्हणाले की, त्यांच्या चाळीत १६ बिºहाडे राहतात. पाटील यांच्या घरातील नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याने पाच वर्षांपासून चाळीसाठी सहा इंची नवीन जलवाहिनी टाकली होती. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने रविवारी त्यांनी दुरुस्तीसाठी प्लंबरला पाचारण केले. दुरुस्तीच्या वेळी जलवाहिनीमध्ये कोंबडीची कातडी, पिसे, हाडे सापडली. जवळपास ६० ग्रॅम वजनाची कातडी, पिसे, हाडे जलवाहिनीत अडकली होती. हा कचरा काढल्यानंतर पाणीपुरवठा जास्त दाबाने सुरू झाला आहे. कोंबडीची पिसे, कातडी, हाडे जलवाहिनीत आली कुठून, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पाटील म्हणाले की, शाकाहारींसाठी हा प्रकार सर्वात किळसवाणा आहे. मी स्वत: शाकाहारी असल्याने या प्रकाराने हादरलो आहे, असे त्यांनी सांगितले.
केणे चाळीला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीत डीएनसी येथील महापालिकेच्या जलकुंभातून पाणी सोडले जाते. तेथे सुरक्षारक्षक नाही. अनेकदा या टाक्यांवर दारूपार्ट्या झडत असल्याचे प्रकारही उघड झाले होते. या बहाद्दरांकडूनच या टाक्यांमध्ये कोंबडीची पिसे, कातडी व हाडे टाकली असावीत. तसेच बड्या जलवाहिनीशेजारी असलेल्या ढाब्यातून फेकलेला कचरा फुटलेल्या जलवाहिनीत गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही प्रभागांमध्ये आधीच दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर असताना या किळसवाण्या प्रकाराने पालिकेचा बेजबाबदारपणाच उघड झाला आहे. ते नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारे आहे. महापालिका केवळ कर वसूल करते; मात्र कर भरणाऱ्यांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करणे हे महापालिका कर्तव्य समजत नसल्याचा आरोप चाळवासीयांनी केला आहे. यासंदर्भात तक्रार केलेली नसली, तरी महापालिकेने स्वत:हून या प्रकाराची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.