ठाण्यात चाचणी न करताच कोरोना रुग्णांना घरी सोडण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:46 AM2020-06-05T00:46:43+5:302020-06-05T00:46:48+5:30

महापौरांचा गंभीर आरोप : आयुक्तांना लिहिले पत्र

Types of leaving corona patients at home without testing in Thane | ठाण्यात चाचणी न करताच कोरोना रुग्णांना घरी सोडण्याचे प्रकार

ठाण्यात चाचणी न करताच कोरोना रुग्णांना घरी सोडण्याचे प्रकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उपचारासाठी दाखल झाल्यानंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी कोरोना रुग्णांना बरे वाटल्यानंतर तत्काळ घरी सोडले जात असल्याचा धक्कादायक आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. वास्तविक, घरी सोडण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे असतानाही तसे केले जात नसल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे पत्र त्यांनी आयुक्त विजय सिंघल यांना दिले आहे.


ठाण्यात कोरोनावर १५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ११५ रुग्ण हे बरे झाले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, या मागचे वास्तव आता समोर येत आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना सात ते आठ दिवसांत बरे वाटू लागल्यास आणि ताप येत नसल्यास पुन्हा चाचणी न करताच त्यांना घरी सोडले जात आहे.


वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट सांगितले होते की इतर राज्याप्रमाणे किंवा केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार नाही तर जोपर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही, त्याची चाचणी निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्याला घरी सोडू नये. परंतु, त्याकडेही खाजगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

शहरात झोपडपट्टी भागात रुग्ण वाढत आहेत. त्यात चाचणी न करता एखाद्याला घरी सोडले जात असेल आणि तो पूर्णपणे बरा झाला नसेल, तर त्याच्या संपर्कातील इतरांनाही लागण होऊ शकते. ही चिंतेची बाब असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यातही या रुग्णालयांकडे विचारणा केली असता आमच्याकडे तशा स्वरुपाचे आदेश किंवा पत्र आलेले नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Types of leaving corona patients at home without testing in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.