खासगी करवसुली कंत्राटावरून भिवंडीच्या महापौरांचा यू-टर्न; महासभेत फक्त झाली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:05 PM2021-01-01T23:05:28+5:302021-01-01T23:05:35+5:30
महासभेत फक्त झाली चर्चा : ठराव झाला नसल्याचा दावा
भिवंडी : पालिकेच्या महासभेत घर, पाणीपट्टी वसुलीसाठी कंत्राटदार नेमण्याचा ठराव मंजूर झाल्यावर त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह विविध संघटनांनी विरोध केला. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासन दखल घेत नसल्याने त्यांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देताच, महापौर प्रतिभा पाटील यांनी गुरुवारी उपोषणकर्त्यांना चर्चेला बोलावले. तहकूब महासभेत कंत्राटाची केवळ चर्चा झाली. त्या संदर्भातील ठराव मंजूर झाला नसल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले.
महापालिकेच्या १६ डिसेंबर रोजी झालेल्या तहकूब महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव मागे घेण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कांबळे यांनी २८ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. कांबळे यांच्यासह सात महिला उपोषणात सहभाग घेतला होता. कांबळे यांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देताच महापौरांनी त्यांना बोलावले.
आंदोलनकर्त्या महिलांनी महापौरांना प्रश्न विचारला की, जर ठराव मंजूर केला नाही, तर मग आम्ही मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. त्यावेळेस आपण का सांगितले नाही वा आतापर्यंत ज्या पक्ष, संघटना व संस्था यांनी या ठरावाला विरोध केला असता, त्या संदर्भात मनपा प्रशासनाने अधिकृत भूमिका का स्पष्ट केली नाही. अशी प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्यावर महापौरांनी प्रतिक्रिया देणे टाळले, असे कांबळे यांनी सांगितले.
महापौरांनी केवळ ठरावावर चर्चा झाली, असे आश्वासन महापौरांनी दिल्याने आपण उपोषण मागे घेतले, असे कांबळे म्हणाल्या. जर नागरिक आणि आम्हाला अंधारात ठेऊन हा ठराव मंजूर केला, तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला.
आयुक्तांशी होऊ शकला नाही संपर्क
अखेर गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या विनंतीवरून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा सुरेखा पाटकर यांनी आंदोलनकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी होऊ शकला नाही.