अंबरनाथमध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून अनेकांचा 'यू टर्न'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:58+5:302021-09-24T04:46:58+5:30
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विनामास्क फिरणाऱ्या आणि गाडीची कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात येते आहे. मात्र ...
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विनामास्क फिरणाऱ्या आणि गाडीची कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात येते आहे. मात्र या नाकाबंदीला काही वाहनचालक चकवा देत आहेत. पोलिसांना पाहून थेट हे वाहनचालक गाडी युटर्न घेऊन पळून जातात, मात्र अशा पळून जाणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
अंबरनाथमध्ये कोरोना संपल्याच्या अविर्भावात मास्कही न लावता अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे या कोरोना पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कंबर कसली आहे. अंबरनाथ शहराच्या विविध भागात सध्या पोलीस कधीही अचानकपणे नाकाबंदी लावतात. या नाकाबंदीत गाडीची कागदपत्रे तपासणीसोबतच मास्क न घातलेल्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते. अंबरनाथच्या हुतात्मा चौकात दररोज मोठा फौजफाटा घेऊन ही नाकाबंदी लावली जाते. नाकाबंदी लागलेली पाहून ज्यांनी मास्क लावलेला नसतो, असे वाहनचालक दुरूनच पोलिसांना चकवा देत यू टर्न मारतात. मात्र जे लोक मास्क घालून पुढे जातात, ते कागदपत्रांच्या कचाट्यात अडकतात. पोलिसांच्या कचाट्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि मगच त्यांना सोडले जाते. काहीवेळाने पोलीस कर्मचारी तिथून निघून जातात. तर पोलिसांना चकवा दिलेल्यांच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच आनंद असतो.