आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:40 AM2021-12-21T05:40:16+5:302021-12-21T05:41:19+5:30
‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’ची शिक्षण परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विद्यार्थ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे ते स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपली शिक्षणपद्धती ही अधिक प्रगल्भ कशी होईल, याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’च्या वतीने रविवारी गडकरी रंगायतनमध्ये ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांची वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषद पार पडली. सामंत म्हणाले की, शिक्षण परिषद हा कार्यक्रम शासनाने घेतला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण, त्यांची अंमलबजावणी यातून भावी पिढीला काय द्यायचे, याचा विचार शासनाने करावा. ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस ठरलाे, पण ऑफलाइन परीक्षा जाहीर करताच राक्षस झालो. शिक्षण ऑफलाइन चालेल, पण परीक्षा ऑनलाइन घ्या, असे विद्यार्थी सांगतात तेव्हा चिंता वाटते.
समुद्र आणि त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करणारे विद्यापीठ तयार करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आपली शिक्षण पद्धत वेगळी आणि सुदृढ ठरावी की, परदेशातून शैक्षणिक संस्थांनी आपल्याकडे येउन तिचा अभ्यास करावा. त्यानुसार देशासाठी आदर्श पॅटर्न ठरेल असे काम शालेय व उच्च शिक्षणात राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डाॅ. अनिल काकोडकर आणि इतर ज्येष्ठ शिक्षण मंडळी नवीन शिक्षण धोरणाचा अहवाल मांडत असतील तर तो स्वीकारलाच पाहिजे. यापुढे होणाऱ्या शिक्षण परिषदेला मी श्रोता म्हणून बसेन. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकणपट्ट्यात बालशिक्षणाची गरज आहे. याची सुरुवात माझ्या क्षेत्रात, विभागात करता येते का, याचा प्रथम विचार करेन, असेही ते म्हणाले.
पानसे यांच्यासोबतच्या भेटीची चर्चा
- मनसेचे नेते अभिजित पानसे हे सामंतांना नुकतेच भेटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
- त्यावर सामंत म्हणाले, पानसे सामंत यांच्याकडे आले काय आणि सामंत पानसे यांच्याकडे आले काय, याने काय फरक पडताे. दाेघे भेटले तर चांगलेच आहे ना, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली.
आपले मत काय आहे?
शिक्षणमंत्र्यांच्या या विधानाविषयी आपल्याला काय वाटते? आपण आपले मत आम्हाला ९५९४०५७४५५ या क्रमांकावर कळवावे. यानिमित्ताने या विषयावर समूळ चर्चा व्हावी अशी ‘लाेकमत’ची भूमिका आहे.