उद्धव येणार खड्ड्यांतून? अंबरनाथमध्ये जानेवारीत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:28 AM2018-12-28T04:28:34+5:302018-12-28T04:29:07+5:30
अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या राष्ट्रीयस्तरावरील शूटिंग रेंजचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ जानेवारीला होणार आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या राष्ट्रीयस्तरावरील शूटिंग रेंजचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ जानेवारीला होणार आहे. ठाकरे ज्या रस्त्याने येणार आणि जाणार आहे, तो रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. नागरिकांसाठी नव्हे तर किमान उद्धव यांच्या आगमनामुळे तरी हे रस्ते दुरुस्त होतील, अशी आशा नागरिक बाळगून आहेत. ग्रामीण भागासोबत शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएकडे असलेल्या रस्त्यांचीही हीच अवस्था असल्याने हे रस्ते ठाकरे यांच्या आगमनामुळे तरी दुरुस्त होतील, हे निश्चित मानले जात आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने विम्को कंपनीशेजारीच जुन्या शूटिंग रेंजचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी सर्व सुविधा असलेले असे राष्ट्रीयस्तरावरील शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिकेने आणि सत्ताधारी शिवसेनेनेही सर्व ताकद पणाला लावली आहे. शूटिंग रेंजचे काम पूर्ण झाले असून या रेंजचे उद्घाटन उद्धव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनासोबत जाहीर सभाही घेण्यात येणार आहे. या जाहीर सभेची जय्यत तयारीही पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी खासदार शिंदे यांनी बैठक घेतली असून कामाचे नियोजनही झाले आहे. एकीकडे पक्षाच्या वतीने कार्यक्रमाची तयारी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे यांचे आगमन कसे आणि कुठून होणार आहे, याचे नियोजन अद्याप हाती न आल्याने पक्षातील प्रमुख नेते, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी चिंतेत आहेत.
ठाकरे हे हेलिकॉप्टरने तरी शहरात आले, तरी परतीचा मार्ग हा अंबरनाथ-काटईनाका-शीळफाटामार्गे मुंबईला जाण्याची शक्यता आहे. गाडीचे येण्याचे नियोजन आल्यावरही हाच मार्ग अवलंबला जाणार आहे. मात्र, या मार्गावरील काटईनाका ते अंबरनाथ एमआयडीसी चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता हा एमआयडीसीच्या मालकीचा आहे. तर, या रस्त्याचे बांधकाम एमएमआरडीएने केले आहे. मात्र, पावसामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे. खड्डेही पडले आहेत. पावसाळा संपून तीन महिने उलटले, तरी अजून या रस्त्याची दुरुस्ती सक्षम प्राधिकरणाने केलेली नाही. तर, हीच परिस्थिती अंबरनाथ एमआयडीसी चौक ते फॉरेस्टनाका येथील लादीनाकयापर्यंतची आहे. त्यातल्या त्यात फॉरेस्टनाका ते पेट्रोलपंपाचा १०० मीटरचा रस्ता हा तर नागरिकांसाठी त्रासदायक झाला आहे. हा रस्ता एमएमआरडीएचा असतानाही अंबरनाथ पालिकेने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, आज पुन्हा त्या रस्त्याची अवस्था आहे तशीच झाली आहे. हा रस्ता नागरिकांसाठी सातत्याने त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, चार महिने उलटले, तरी या रस्त्याची दुरुस्ती एमएमआरडीएने केलेली नाही. तर, या रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानेही या रस्त्याची जबाबदारी झटकली आहे. दोन महत्त्वाच्या सरकारी संस्थेकडे हा रस्ता असतानाही त्याची दुरुस्ती पालिकेने करून अंबरनाथमधील नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता उद्धव यांच्या येण्याजाण्याचा रस्ता हा फॉरेस्टनाकाच असल्याने त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही ज्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, त्याच रस्त्याची दुरुस्ती ही उद्धव यांच्या आगमनामुळे होईल, अशी आशा अंबरनाथकर बाळगून आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झाली होती तीन ते चार महिने चालढकल
ज्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार महिने चालढकल करण्यात आली, त्या रस्त्याची दुरुस्ती नेमक ी करणार कोण, हे पाहणे गरजेचे आहे.
नेत्यांच्या आगमनात खो नको म्हणून वेळेवर पालिका प्रशासन पुन्हा हा रस्ता दुरुस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.