उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:08 AM2024-08-11T06:08:11+5:302024-08-11T06:08:34+5:30
'शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असाही झळकला बॅनर
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागताच ठाण्यात उद्धवसेना व शिंदेसेना यांच्यात बॅनर वॉर भडकले आहे. अगोदर ‘खरी शिवसेना कोणाची?’ असा सवाल करीत ठाणेकरांचा कौल घेण्याचा प्रयत्न उद्धवसेनेचे केदार दिघे यांनी केला. काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीकरिता उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी करताच ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’, अशा घोषवाक्याचे आणि सोबत उद्धव ठाकरे काँग्रेसश्रेष्ठींना लोटांगण घालत असल्याचे व्यंग्यचित्र असलेले बॅनर शिंदेसेनेकडून झळकले. उद्धवसेनेने तीन पेट्रोलपंप येथील हे बॅनर खाली उतरवले. येत्या काही दिवसांत हे बॅनरयुद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दोन दिवसांपूर्वी बॅनर लावत, ‘पक्ष कोणी चोरला? काय आहे हिंदुत्व?’, असा सवाल थेट ठाणेकरांना केला. सोबत व्हॉट्सॲप नंबर देऊन मत नोंदविण्याचे आवाहन केले. दिघे यांनी ठाणेकरांना आवाहन करण्याकरिता लावलेला तो बॅनर ठाण्यात ठिकठिकाणी आजही कायम आहे. उद्धव यांचा दिल्ली दौरा पूर्ण होताच ठाण्यात ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’, अशी टिप्पणी केलेले बॅनर लागले. त्यावर शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी लोटांगण घातले असून, त्यांच्या मागे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ही मंडळी दाखविण्यात आली. बॅनरची माहिती उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरविले.
शिवसैनिक तुमचा नोकर नाही
ठाण्यात आणखी एक बॅनर लागला असून, त्याच्यावर ‘पक्ष कोणी विकला? खुर्ची, पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्त्वांच्या गोष्टी करू नयेत. शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असे नमूद केले आहे. बॅनरच्या खाली राजेश मोरे यांचे नाव आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. बॅनर लावताना स्वत:चे नाव न देता, फोटो न लावता अशा प्रकारचे फालतू बॅनर लावून चर्चेत यायचे हा प्रकार केविलवाणा आहे. त्यामुळे मला त्यांची कीव येते.
- केदार दिघे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना