उद्धव ठाकरे ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 04:07 PM2024-05-18T16:07:47+5:302024-05-18T16:09:05+5:30
मोदी नकली सेना म्हणाले म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.
ठाणे - उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. परंतु ते ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात अशी खिल्ली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची उडवली आहे.
ठाण्यातील प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २० तारखेला आराम करायचा नाही. आधी स्वत: कुटुंबासह मतदान करायचे त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे. महायुतीला मतदान करायचे हे जनतेनं ठरवलं आहे. रेकॉर्ड ब्रेक जागा ठाण्यातील जिंकायची आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितलं. पुढील १० वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. महायुती विकासाचं बोलते, परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्याच देतात. आमची शिवसेना आणि त्यांची शिव्या सेना आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदी नकली सेना म्हणाले म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतान नारे लावू शकते का? याकूब मेमन कबर ,पाकिस्तानचे झेंडे वापरत आहे, प्रचारात व्होट जिहाद मागत आहे. मग ती काय आहे नकली शिवसेना. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारस दार आहेत पण विचाराचे नाही. राज ठाकरे, एकनाथ शिंदे हे विचाराचे वारसदार आहे. उद्धव ठाकरेंना आरएसएस ध्वज फडके वाटतं. शिवसेनेचे भगवे ध्वज फडके वाटू लागेल. आज भारत कोणालाही रोखू शकतो. आपण नवभारतासाठी काम करत आहे. लोकांच्या मनात मोदी. ठाण्यात १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली. ठाणे हा आपल्या विचारांचा मतदार आहे. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनवायचे असंही फडणवीसांनी सांगितले.