१५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:48 PM2024-08-10T22:48:53+5:302024-08-10T22:49:22+5:30

ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र सोडले. 

Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde along with Mahayuti government in Thane | १५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल

१५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल

ठाणे - नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचं सुरू आहे. लाडकी बहिण योजनेचे ४ हफ्ते देण्यासाठी निवडणूक पुढे ढकलतायेत. जेणेकरून महिलांचा विश्वास बसेल. आम्हाला तुमची भीक नको हे महिलांनी ठरवलं पाहिजे. १५०० रुपये लाच देऊन शिवरायांचा महाराष्ट्र विकू पाहतायेत. प्रकल्प गुजरातला पळवतायेत. १५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहोत का? योजना आहे. लाभ जरूर घ्या. हे त्यांच्या खिशातले पैसे नाही तर तुमचेच आहेत असं सांगत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. 

ठाण्यात भगवा सप्ताह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ५० हजार योजना दूत गावात पोहचवतायेत. प्रत्येकाला १० हजार रुपये देणार आहेत. यांचीच माणसे, चेलेचपाटे हे योजनादूत म्हणून घुसवणार आणि त्यातून पैसा काढणार. जाहिरातीतून करोडो रुपये उकलतायेत. आपला भगवा भगवाच असला पाहिजे. त्यावर चिन्ह नको. हिंदुत्वाचा भगवा, शिवाजी महाराजांचा भगवा तोच झेंडा आपल्या हातात बाळासाहेबांनी दिला आहे. आतापासून मशालीचा प्रचार करा. स्वाभिमानाची मशाल घराघरात पेटवा. मी जंगल वाचवण्याचं काम करत होतो म्हणून आरे वाचवलं. रक्त शोषणारी औलादी आमच्या नाहीत. आम्ही जे काही करतो उघडपणे करतो. छातीवर वार करतो. पाठीवर वार करत नाही. जे काही करायचे विधानसभा निवडणुकीत करायचे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय नुसत्या घोषणा देऊन निवडणूक जिंकता येणार नाही. मिंदे सरकार घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ करतंय. दुबार मतदानाची तक्रार करूनही जिल्हाधिकारी कारवाई करत नाही. ३ महिने थांबा, त्यानंतर शिंदेंची चांडाळ चौकडी सरकारी कलेक्टर सगळ्यांना कुठे पाठवतो ते बघा, यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. ठाणे उभं राहण्यामागे शिवसेनाप्रमुखांचे प्रेम, ठाणेकरांचे शिवसेनेवर प्रेम आणि अपार मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती तर शिंदेंची दाढी उगवली नसती असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. 

दरम्यान, नमकहराम २ समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. हे नाग नाही तर मांडुळ आहे. दुतोंड्या हे सरपटणारे प्राणी आहे. मोदींसमोर वळवळणारे मांडुळ आहे. लबाडी करून हे जिंकलेले आहेत. सगळं काही पळवलं, जोरजबरदस्ती, पैशांचे वाटप करूनही सव्वा पाच लाख ठाणेकर निष्ठेने आणि प्रेमाने आपल्यामागे उभे राहिले हा आपला विजय आहे. जे काही आहे हक्काचे आणि प्रेमाचे आहे. भाज्या विकत घेता येतात, मते विकत नको. प्रचंड पैसा ओतूनसुद्धा एवढी मते आपल्याला मिळाली. मुंबईतील जागा चोरलेली आहे असा आरोप ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला. 

संघटनात्मक काम करणारे सैन्य हवं

मुंबई, ठाणे, कोकण माझेच आहे. कोकणात पराभव कसा होऊ शकतो, हे सर्व चाळे अब्दालीचे आहेत. जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायेत त्या दरोडेखोरांवर राग आहेच. अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी चोखलं नाही. हा सामना होऊ द्या, महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे शिवसेना दाखवून देईल. काही काही गोष्टी आपण सोडून देतो. तुम्ही कितीही पैसा, योजना आणा, आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. संघटनात्मक काम करणारे सैन्य मला हवं. नुसता जमाव आला हिंसाचार केला असे नको असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा साधला.
 

Web Title: Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde along with Mahayuti government in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.