शिंदेंविरुद्धच्या लढाईत 'दिघें'ची एन्ट्री झाली, पण 'मातोश्री'ला उशिरा जाग आली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:05 PM2022-08-02T19:05:41+5:302022-08-02T19:10:01+5:30
उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे.
कुजबुज
१.‘मातोश्री’ला उशिरा जाग आली
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद खिळखिळी झाली आहे. महत्त्वाचे शिलेदार शिंदेंच्या कळपात गेले आहेत. ज्या आनंद दिघेंनी जिल्ह्यात शिवसेना वाढविली, त्यांच्याच नावाचा आधार घेऊन शिंदे जिल्ह्यात वाटचाल करीत आहे. शिवाय दिघे यांचे कार्यालय असलेल्या ठाणे येथील आनंद मठावर शिंदे समर्थकांनी ताबा सांगितला होता. त्यानंतर मातोश्रीने ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे, याबाबत निर्णय घेतला नव्हता.
आता उशिरा का होईना रविवारी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. ठाणेकर आणि दिघे या आडनावाचे भावनिक नाते आहे. यामुळे ठाकरे यांनी शिंदेच्या बंडानंतर लगेच केदार यांच्याकडे नेतृत्व सोपवून त्यांना आनंद मठाचा ताबा घ्यायला सांगून तेथून जिल्हा शिवसेनेचा कारभार हाताळला असता तर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड थांबली असती, एवढे नुकसान झाले नसते.
२. शिवसैनिक असल्याचा टेंभा !
कालपर्यंत एका ताटात जेवणारे परस्परांचे अक्षरश: वैरी झाले आहेत. शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर आणि श्याम चौगुले यांच्यावर घेतला गेलेला चोरीचा आळ आणि धमकी दिल्याचा झालेला आरोप पाहता कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या दोन गटातील वाद आता थेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेला आहे.
खोट्या तक्रारी दाखल करून घेताना आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. आमच्यावर कितीही दडपण आणा, पण आम्ही गळाला लागणार नाही, अशी भाषा शिवसैनिक करीत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असा नारा शिंदे गटात गेलेले स्थानिक पदाधिकारी देत आहेत, पण ते शिवसैनिक नाहीत.
राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे असा प्रवास करून पुन्हा शिवसेनेत आलेल्यांनी आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे शिवसैनिक असल्याचे बोलूच नये. शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेत आलेले त्यांच्याबरोबरच पक्षातून बाहेर गेले. त्यामुळे मूळचा शिवसैनिक पक्षात आहे तिथेच आहे. शिंदे गटात येण्यासाठी कितीही खोटेनाटे आरोप करून त्रास दिला तरी शिवसैनिक अधिक जोमाने पेटून उठेल आणि पक्ष संघटना मजबूत करेल, अशी कुजबुज जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.