"अतिरेक करू नका...अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल"; खासदार राजन विचारे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 09:33 PM2022-08-01T21:33:42+5:302022-08-01T21:38:47+5:30
नवनियुक्त जिल्हाप्रमुख केदार दिघेंसोबत विचारे यांचे शक्ती प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आम्ही शिवसैनिक आहोत,तेव्हा अतिरेक करू नका, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिला आहे. ठाण्याच्या शिवसेनेत रविवारी नविन नियुक्त्या जाहिर झाल्यानंतर सोमवारी विचारे तसेच नवनियुक्त पदाधिकारी आणि काही शिवसैनिकांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंद आश्रमात शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. फुटीनंतर प्रथमच विचारे यांनी मौन सोडले असून खऱ्या अर्थाने ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
"दिघेंच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती, त्यांचा खरा वारसदार आज जिल्हाप्रमुख झाला. आकसाने कुणाच्या झुणका भाकर केंद्रावर कारवाई करू नका. आपापसात काही करायला लावू नका, याच शिवसैनिकांमुळे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचलात. बाळासाहेब, दिघेसाहेब यांचे नाव घेता तसे काम करा. आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, अतिरेक करू नका... जशास तसे उत्तर दिले जाईल", असा इशारा राजन विचारे यांनी दिला. केदार दिघे यांनीही एकनाथ शिंदे यांना, काकांच्या बाबतीत खरे काय घडले हे विलंब न लावता सांगा, असे आव्हान दिले.
राज्यातील शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड नुकतेच झाले. त्यामुळे, शिवसेना नेतृत्व हादरले असतानाच जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यानी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मातोश्रीने हकालपट्टीचे अस्त्र उगारूनही सेनेतील गळती थांबत नव्हती. अखेर, रविवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे व उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची वर्णी लावण्यात आली. या नियुक्त्या नंतर सोमवारी विचारे व केदार दिघे समर्थकांनी दिवंगत दिघे यांच्या शक्तीस्थळावर आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. यावेळी अनेक जुन्या शिवसैनिकांसह काही माजी नगरसेवकही उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी आजपासून दिघे साहेबांचे सैनिक कामाला लागल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता प्रतिआव्हान दिले.