राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:02 PM2018-05-17T22:02:10+5:302018-05-17T22:02:10+5:30

निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही

uddhav thackeray live speech in ulhasnagar - Like the Governor, Chief Minister Nama - Uddhav Thackeray's BJP has tremendous power | राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला

राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला

Next

उल्हासनगर - देशात कर्नाटक  निवडणुकीच्या  निमित्ताने  जे  सुरु आहे ते पाहिल्यावर या देशात लोकशाही ची अवहेलना होते आहे ही असली लोकशाही काय कामाची असे म्हणत  राज्यपालप्रमाणे  मुख्यमंत्री ही नेमा आणि निवडणुकीत खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचवा, देशाला आणि राज्याला शिवशाहीची आवश्यकता आहे असा विश्वास व्यक्त करत या देशात लोकशाहीची अवहेलना होणार असेल तर ही लोकशाही काय कामाची निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही, राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा असा जबरदस्त टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.

आज गुरुवारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त  उद्धव ठाकरे उल्हासनगर येथे आले होते. गोल मैदान पोलिस चौकीसमोरील मोहन लाइफ स्टाइल येथे खा. डॉ. शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून त्यानिमित्त उल्हासनगरात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली होती. 

आज खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम बघताना चार वर्षांपूर्वीचा तरुण मुलगा आठवतो. तो हाडाचा डॉक्टर असला तरी रक्ताचा शिवसैनिक आहे. एखादी जबाबदारी दिली की ती फत्ते होणार, याची खात्री असते. तसा विश्वास त्याने आपल्या कामातून निर्माण केलाय, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे काढले.
महापालिका निवडणुकीनंतर ते प्रथमच उल्हासनगर येथे आले होते. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा चार वर्षांचा कार्यअहवाल आणि वेबसाईटचे उदघाटन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन होण्यापूर्वीच एवढी गर्दी होते याचा अर्थ खासदार म्हणून योग्य काम चालू आहे. हा जनतेचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असेल तर कोणालाही भिण्याची गरज नाही, असे कौतुगोदगार उद्धव ठाकरे यांनी काढले. माझ्या एका शब्दाखातर त्याने अंबरनाथच्या शिवमंदिराचा कायापालट करून दाखवला, तसेच उल्हासनगरमध्येही अद्ययावत रुग्णालय उभे करून दाखवणार म्हणजे दाखवणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विकास आराखडा कोणाचा, जनतेचा की फाईल चोरणाऱ्यांचा, असा बोचरा सवालही त्यांनी केला.

उल्हासनगरवासीयांनी शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले आहे. २०१४च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भरभरून मताधिक्य दिले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि आ. डॉ. बालाजी किणीकर सातत्याने उल्हासनगरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगरचा विकास आराखडा जनतेला उध्वस्त करणारा आहे, त्यामुळे शिवसेनेने त्याला कडाडून विरोध केला आहे आणि करत राहील, असे श्री. शिंदे म्हणाले. 

जनसंपर्क कार्यालयासाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. हे फक्त खासदार कार्यालय नसून सर्वसामान्य जनतेचे हक्काचे ठिकाण आहे, असे खा. डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांच्या उल्हासनगरमध्ये अनेक सभा झाल्या होत्या. आजही इथल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्या सभांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यामुळे उद्धव साहेबांच्या सभेविषयी उल्हासनगरवासियांच्या मनात उत्सुकता होती, असेही ते म्हणाले. उल्हासनगरशी संबंधित अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. इथल्या कामगार हॉस्पिटलचा पुनर्विकास शिवसेनेमुळेच मार्गी लागला आहे. रेल्वे स्थानकावरील सुविधा, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रदूषणाचा प्रश्न अशा प्रत्येक बाबतीत शिवसेनेने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संध्या वढावकर, जिल्हा संघटक लता पाटील, विजया पोटे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: uddhav thackeray live speech in ulhasnagar - Like the Governor, Chief Minister Nama - Uddhav Thackeray's BJP has tremendous power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.